पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला. तर, पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख विजयी झाल्या. ३६ तासांहून अधिक काळ निवडणूक प्रक्रिया सुरू होती. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील विजयी झाले असून, अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. तसेच, अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक विजयी झाले. त्यांनी काँग्रेस उमेदवार आदिती पोहरे यांचा पराभव केला. नागपूर पदवीधरमधील लढतीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी दुसर्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतावर प्रथम क्रमांक मिळवणार्या भाजपच्या सुधाकर कोहळे यांना मागे टाकत विजय मिळवला.
पुणे पदवीधरमध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख आणि भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्यात जोरदार चुरस झाली. यात हर्षदा देशमुख विजयी ठरविण्यात आल्या.
विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत प्रामुख्याने कोणत्याच उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पुढच्या फेऱ्यांची मतमोजणी करावी लागली. पदवीधर मतदारसंघात तब्बल १७,२९९ मते अवैध ठरली. या बाद मतांमध्ये सुमारे ७० टक्के मते भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना मिळाल्याचे दिसून आले. विजयासाठी १,१३,११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पुणे पदवीधर मतदारसंघात अंतिम ४४ व्या फेरीनंतर हर्षदा देशमुख यांना १ लाख १३ हजार ८४० मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. तर, डॉ. स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मते मिळाली.
शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांनी विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यासह माजी आमदार दत्ता सावंत यांचाही पराभव केला. त्यामुळे या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
या निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांना २३,११७ मते मिळाली. शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना १६,३४७ मते मिळाली असून, सानप दुसऱ्या क्रमांकावर राहिले. विद्यमान काँग्रेस आमदार जयंत आसगावकर यांना ८,९६५ मते मिळाली. तर, राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी आमदार दत्ता सावंत यांना १२,६८७ मते मिळाली. त्यामुळे गावडे यांनी एका विद्यमान आमदाराचा, तर एका माजी आमदाराचा पराभव केल्याचे दिसून आले.
या निवडणुकीत एकूण ५१,५०० मते वैध ठरली होती. तर १,६७३ शिक्षकांची मते अवैध ठरविण्यात आली. पहिल्या पसंतीच्या मतांचा विजयासाठी आवश्यक कोटा २५,७५६ निश्चित करण्यात आला होता. परंतु, कोणत्याही उमेदवाराला हा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पुढील फेर्यांमध्ये सर्वाधिक मते मिळवणारे भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी ठरविण्यात आले.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केलेले नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांना अधिकृत विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पुणे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात हे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा करण्यात आली. विजयाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कौस्तुभ गावडे यांना विजयाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे अधिकृत अभिनंदन केले.
पुणे विधान परिषद शिक्षक निवडणुकीच्या निकालात भाजप विजयाच्या जवळ आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निकालांकडे राज्याचे लक्ष लागले असताना, पुण्यातील भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. इतर उमेदवारांच्या निकालांबाबतही उत्सुकता वाढली असून, मतमोजणीतील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात प्राथमिक अंदाजानुसार कौस्तुभ गावडे यांना २३,२००, तर सचिन सानप यांना १७,००० मते मिळाली आहेत. मतमोजणी पूर्ण झाली असून, सानप यांची मते मोजून विजयाचा कोटा पूर्ण करायचा का, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ
हर्षदा देशमुख — १,११,४२५ मते
स्मिता जाधव — १,०२,५५४ मते
३० फेऱ्यांनंतरही दोन्ही उमेदवारांमधील मतांची ही तफावत कायम असून, मतमोजणीच्या पुढील प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे.
आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष) यांना १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत, तर डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत.
त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्यावर ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली आहे. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी १ हजार ८१६ मतांची गरज आहे.
इतर उमेदवार :
- सुनिल जबरचंद मोदी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) – ३ हजार ६६ मते
- सोमनाथ जनार्धन साळुंखे – २ हजार ६३८ मते
- नामदेवराव जाधव – १ हजार ९५५ मते
- लक्ष्मण साहेबराव हरणावळ – १ हजार ४७२ मते
पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा जाधव यांना १ लाख १२ हजार ४०० मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना १ लाख २ हजार मते मिळाली.
पहिल्या फेरीत हर्षदा जाधव आघाडीवर आहेत. मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांमधून विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण न झाल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी आता रंजक टप्प्यात आली आहे. मतपत्रिकांची विभागणी आणि वैध-अवैध मते वेगळी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीची ५० टक्क्यांहून अधिक मते मिळणे कठीण दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार, याचा अंतिम निर्णय आता दुसऱ्या किंवा पुढील पसंतीक्रमाच्या मतांच्या मोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी रात्री ११ नंतर सुरू झाली. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मतमोजणीदरम्यान अवैध मते बाजूला काढल्यानंतर एकूण २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा १ लाख १३ हजार ११३ इतका निश्चित करण्यात आला.
मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. सुरुवातीला सर्व मतपत्रिकांचे गठ्ठे बांधणे आणि वैध-अवैध मतांची वर्गवारी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर अंतिम वैध मतांची संख्या जाहीर करत विजयासाठी आवश्यक कोटा ठरवण्यात आला.
आता पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असून, कोणत्याही उमेदवाराने १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा पहिल्या पसंतीच्या मतात पूर्ण केला, तर तो थेट विजयी घोषित होईल. तसे न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी आणि बाद फेरी राबवली जाईल. या निकालाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरू असून राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. मतमोजणीच्या प्राथमिक टप्प्यात मतपत्रिकांचे वर्गीकरण आणि छाननीचे काम प्रशासनाकडून वेगाने केले जात आहे.
विजयाचा कोटा ठरणे बाकी
पदवीधर मतदारसंघाच्या नियमानुसार विजयासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा अद्याप ठरणे बाकी आहे. मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतरच विजयासाठी आवश्यक असणारा अधिकृत कोटा जाहीर केला जाईल.
वैध आणि अवैध मतांचे प्रमाण थोड्याच वेळात स्पष्ट होणार
सध्या मतपत्रिकांची तपासणी सुरू असून त्यातील वैध व अवैध मते वेगळी काढण्याचे काम सुरू आहे. किती मते अवैध ठरली आणि किती मते वैध आहेत, याची अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत थोड्याच वेळात जाहीर केली जाणार आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीदरम्यान एकूण ५१ हजार ५११ मते वैध ठरली आहेत. नियमानुसार पहिल्या पसंतीची मते मोजल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा २५ हजार ७५६ इतका निश्चित करण्यात आला आहे. आता कोणता उमेदवार हा विजयाचा कोटा पहिल्या फेरीत किंवा पुढील पसंतीक्रमाच्या फेऱ्यांमध्ये पूर्ण करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि अपक्ष उमेदवार दत्ता सावंत यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. या लढतीत सचिन सानप तिसऱ्या क्रमांकावर असून, विद्यमान आमदार जयंत आजगावकर पिछाडीवर पडले आहेत. वैध आणि अवैध मतांचे वर्गीकरण पूर्ण झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा निश्चित होणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या पुढील टप्प्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी १०० टेबलांवर मतपत्रिकांचे प्रत्येकी ५० संच तयार करून आणण्यात आले आहेत. या टेबलांवर मतपत्रिकांची तपासणी करून वैध आणि अवैध मतपत्रिकांचे वर्गीकरण केले जात आहे. या प्रक्रियेनंतर पुढील मतमोजणीच्या टप्प्यांना सुरुवात होणार आहे.
प्रत्यक्ष मतमोजणी दुपारी ३ वाजल्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा तयार करण्यात आला आहे. तसेच, मतपत्रिकांची मोजणी करण्यासाठी १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या टेबलांवर मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असून, प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यानंतर निकालाच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, सध्या मतपत्रिकांचे प्रत्येकी ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे चार तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात मतपत्रिकांची छाननी केली जाणार आहे.
गठ्ठे तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिकांचे पात्र आणि अपात्र असे वर्गीकरण केले जाईल. या छाननीतून वैध मतपत्रिकांची संख्या निश्चित होईल. त्यानंतर निवडणुकीतील विजयासाठी आवश्यक असलेला कोटा ठरवण्यात येणार आहे.
कोटा निश्चित झाल्यानंतर वैध मतपत्रिकांचे उमेदवारनिहाय वर्गीकरण केले जाईल. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्याकडे उमेदवारांचे प्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
आमदार कोण होणार?
पुणे पदवीधर मतदारसंघ: डॉ. स्मिता योगेश जाधव (भाजप) विरुद्ध हर्षदा देशमुख (राष्ट्रवादी - शरद पवार)
पुणे शिक्षक मतदारसंघ: कौस्तुभ गावडे (भाजप) विरुद्ध सचिन सानप (अपक्ष) विरुद्ध जयंत आसगावकर (काँग्रेस)
पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६२.७८ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या या आकडेवारीनंतर आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक प्रतिष्ठेची ठरल्याने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेत्यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली होती. त्यामुळे कोणता उमेदवार बाजी मारणार, कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार आणि या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये काही बदल होणार का, याकडे राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Pune MLC Election Results 2026 Vote Counting LIVE: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ टक्क्यांहून अधिक, तर पुणे शिक्षक मतदारसंघात ८२ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली असून, आज २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे स्पष्ट होणार आहे.
दोन्ही मतदारसंघांतील निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मतदानाच्या टक्केवारीनंतर आता उमेदवारांच्या विजयाचे गणित काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मतमोजणीतील प्रत्येक अपडेट आणि निकालाचे ताजे कल जाणून घेण्यासाठी आमच्या लाइव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ६२.७८ टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघासाठी एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी सुमारे २ लाख ४३ हजार ६११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. याशिवाय सुनील मोदी यांच्यासह इतर उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते, हे निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
२०२० च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पदवीधर मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होतो, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मात्र, केवळ मतदानाची टक्केवारी पाहून विजयाचा अंदाज बांधणे शक्य नाही. मतमोजणीनंतरच मतदारांचा प्रत्यक्ष कौल समोर येईल.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात एकूण ६१ हजार ९४० मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी सुमारे ५३ हजार १८५ शिक्षक मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेदांचाही मुद्दा चर्चेत राहिला. शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली होती.
शिक्षक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पदवीधर मतदारसंघापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती पाठिंबा मिळाला, याची उत्सुकता वाढली आहे. विद्यमान आमदार आपली जागा कायम राखतात की नव्या उमेदवाराला संधी मिळते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. उमेदवारांनी प्रचारादरम्यान मतदारांशी संपर्क साधत विविध प्रश्न मांडले. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांना मतदारांनी प्राधान्य दिले, हेही निकालातून समोर येण्याची शक्यता आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही प्रमुख मतदारसंघांमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.