Ghaywal Gang  Pudhari
पुणे

Pune Nilesh Ghaywal Absconding Case: पुण्यातील घायवळ बंधू अद्याप फरार; व्हिसा संपूनही नीलेशचा ठावठिकाणा अस्पष्ट

कोथरूड हल्ला व खंडणी प्रकरणात पोलिसांचे प्रयत्न सुरू; सचिन घायवळचाही शोध लागेना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नीलेश आणि सचिन या दोघा घायवळ बंधूंनी गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांचा घाम काढला आहे. अद्याप ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. कोथरूडमधील दोन तरुणांवर झालेला खुनी हल्ला, तसेच खंडणीच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नीलेश घायवळ याच्या व्हिसाची मुदत संपून दहा दिवस उलटले असले, तरी त्याचा माग पोलिसांना लागू शकलेला नाही. तसेच या गुन्ह्यांमधील सहआरोपी सचिन घायवळ याचासुद्धा ठावठिकाणा पोलिसांना अद्याप लागलेला नाही. त्यामुळे तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लंडनला पसार झालेला कुप्रसिद्ध गुंड नीलेश घायवळ आठवडाभरापूर्वी भारतात दाखल होणे अभिप्रेत होते. मात्र, तो तेथेच वास्तव्यास आहे की अन्य देशात फरार झाला आहे. याचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. आंतराष्ट्रीय पातळीवर एखाद्या गुन्हेगाराला त्याच्या मायदेशात घेऊन यायचे असल्यास वेगवेगळे कायदे, नियम आहेत. त्या अनुषंगाने पुणे पोलिस गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न देखील करीत आहेत. परंतु अद्याप त्यांना नीलेश घायवळ याला भारतात परत आणण्याच्या दृष्टिकोनातून यश आलेले दिसून येत नाही. तर, नीलेश याचा भाऊ सचिन याच्या शोधासाठी पोलिसांनी नगर तसेच मराठवाडा परिसर पिंजून काढला. महिनाभरापूर्वी तो जामखेड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला. मात्र, पोलिस आल्याची चाहूल लागताच तो फरार झाला. नीलेश विदेशात वास्तव्यास आहे; परंतु सचिन येथेच असताना पोलिसांना मिळून येत नाही. त्यामुळे घायवळ बंधूंना कोण्या राजकीय नेत्याने आश्रय दिला आहे ? किंवा कसे याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

कोथरूडमध्ये किरकोळ भांडणातून 17 सप्टेंबर 2025 रोजी टोळक्याने दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिस तपासात या टोळक्यातील पोरं नीलेश घायवळ याच्या टोळीतील असल्याचे समोर आले. मात्र, त्याच काळात नीलेश विदेशात पसार झाला. त्याचा भाऊ सचिन यानेही दडी मारली. नीलेशचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेतो. त्यामुळे, तो तेथे गेला असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून यापूर्वीच रेड कॉर्नर व ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. तसेच, त्याचा नेमका ठावठिकाणा समजण्यासाठी पुणे पोलिसांनी बिटिश उच्चायुक्तांशीही पत्रव्यवहार केला. त्यानंतर, त्याचा लंडनमधील नेमका ठावठिकाणा पोलिसांना समजला. त्याच्या व्हिसाची मुदत गेल्या आठवड्यात (दि. 6) संपली. तसेच यापूर्वी त्याचा पासपोर्टही रद्द केला आहे. त्यामुळे, तो पुण्यात दाखल होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर त्याची माहिती देऊन तेथेच त्याला ताब्यात घेण्याची व्यवस्था केली. मात्र, त्याच्याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कोथरूडमधील दोन तरुणांवरील हल्ल्याप्रकरणी नीलेश व सचिन या घायवळ बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघे वगळता या गुन्ह्यातील अन्य सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्याबाबत पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. तत्पूर्वीच सचिन हाही पसार झाला. त्याच्याविरुद्ध एका महिलेकडून चाळीस लाखांची खंडणी उकळल्याचा, तसेच एका बांधकाम व्यावसायिकाकडून दहा फ्लॅट बळकावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून, खुनी हल्ले, खंडण्या उकळणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कुप्रसिद्ध गुंड नीलेश घायवळ याने अहिल्यानगरमधून बनावट कागदपत्रांच्याआधारे पासपोर्ट मिळवला असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पोलिस तपासात त्याने आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर येऊ नये म्हणून नावात बदल केल्याचे पुढे आले.सचिन घायवळचा शस्त्र परवाना वादग््रास्त कुप्रसिद्ध गुंड नीलेश घायवळ याला पासपोर्ट देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचा भाऊ सचिन याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतरही गृहराज्य मंत्र्यांच्या आदेशाने गृह विभागाने त्याला पिस्तुलाचा परवाना दिल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली होती. त्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याने शिफारस केल्याची चर्चा आहे. त्यावरून देखील राजकीय आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या.

सचिन घायवळचा शस्त्र परवाना वादग््रास्त

कुप्रसिद्ध गुंड नीलेश घायवळ याला पासपोर्ट देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचा भाऊ सचिन याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतरही गृहराज्य मंत्र्यांच्या आदेशाने गृह विभागाने त्याला पिस्तुलाचा परवाना दिल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली होती. त्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याने शिफारस केल्याची चर्चा आहे. त्यावरून देखील राजकीय आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT