पुणे; टीम पुढारी : उपनगरांतील नदीपात्र, कालवे, सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांवर साचलेल्या कचर्याच्या समस्येबाबत दै. 'पुढारी'ने शुक्रवारी 'घंटागाड्या दारोदारी, तरीही कचरा रस्त्यांवरी' या शीर्षकाखाली विशेष वृत्तांकन प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात आली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परिसर चकाचक झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत दै. 'पुढारी'चे आभार मानले आहेत.
वारजे माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे कोपरे परिसरात रस्त्यांसह उत्तमनगर स्मशानभूमीजवळील मुठानदीत रात्रीच्या वेळी नागरिकांकडून कचरा फेकण्यात येत होता. याबाबत दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने शिवणे, उत्तमनगर परिसरासह मुठा नदीपात्रात साचलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ केला आहे.
शिवणे, उत्तमनगर परिसरालगत मुठा नदीपात्रात कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाने हा कचरा तातडीने उचलण्यास सुरुवात केली. आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे म्हणाले की, नदीपात्रात अथवा उघड्यावर कचरा टाकणार्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कचरा संकलनासाठी येणार्या घंटागाड्यांतील कर्मचार्याकडे कचरा द्यावा व परिसराची स्वच्छता राखावी.
बिबवेवाडी परिसरातील कचरा समस्येबाबत दै. 'पुढारी'ने 'कंटेनरमुक्त प्रभाग कागदावर' हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये आले. रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बिबवेवाडी परिसरात 'शून्य कंटेनरमुक्त प्रभाग' ही योजना राबवली गेली; पण नागरिक व कचरा गोळा करणार्या स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचार्यांतील समन्वयाच्या अभावामुळे ठिकठिकाणी कचरा साचला होता. याबाबत दै. 'पुढारी'ने आवाज उठवल्यामुळे बिबवेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या कामाला वेग आला. बहुतांशी ठिकाणी पडलेला कचरा उचलल्याने परिसर चकाचक झाल्याचे रहिवासी कविता वाघमारे यांनी सांगितले.
स्मशानभूमीलगत आणि नदीपात्रात कचरा टाकणार्या नागरिकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी आणि नागरिकांत स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. दै. 'पुढारी'मुळे हा परिसर स्वच्छ झाला आहे.
-चंद्रकांत भुजबळ, रहिवासी, वारजे
पॅरामाउंट सोसायटी व एसबीआय बँकेसमोर रस्त्यावर सर्रास कचरा टाकला जात आहे. दै. 'पुढारी'ने उपनगरांतील कचरा समस्या मांडल्याने आरोग्य विभाग व नागरिक खडबडून जागे झाले आहेत. नागरिकांनीही स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे.
– सुनील पानसरे, रहिवासी, कात्रज
शुक्रवारी सकाळीच 'स्वच्छ' स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचार्यांनी अप्पर परिसरातील कचरा उचलण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या दोन गाड्यांच्या साहाय्याने या भागातील कचरा उचलल्यामुळे आमची दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.
– कौशल्या कांबळे, रहिवासी, बिबवेवाडी
हेही वाचा