पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा 34 तास 42 मिनिटांपर्यंत का रेंगाळली? pudhari
पुणे

Pune Ganesh Visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा 34 तास 42 मिनिटांपर्यंत का रेंगाळली?

शनिवारी सकाळी 9.30 वाजता मिरवणूक सुरू; रविवारी रात्री 8.12 वाजता मिरवणुकीची सांगता

पुढारी वृत्तसेवा

Pune Ganpati Visarjan 34 hours

पुणे: महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने मंडळांवरील निर्बंधांना देण्यात आलेली ढील, मानाच्या मंडळांसह अनेक मंडळांनी घेतलेला मोठा वेळ आदी कारणांमुळे पुण्यातील यंदाची मुख्य विसर्जन मिरवणूक आत्तापर्यंतच्या इतिहासातील विक्रमी वेळेची नोंद करणारी ठरली. या मिरवणुकीला तब्बल 34 तास 42 मिनिटे एवढा वेळ लागला. पुणेकरांचा उत्साही आणि भरभरून प्रतिसाद, विविध कलांचे बहारदार सादरीकरण ही या मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरली.

मानाचे गणपती सायंकाळी साडेसातपर्यंत विसर्जित झाले. त्यापाठोपाठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपतीही रात्री साडेआठ वाजता विसर्जित झाला. प्रचंड गर्दी, गणपती मंडळांचा व पुणेकरांच्या रात्रभर ओसंडून वाहणारा उदंड उत्साहात ही मिरवणूक झाली. (Latest Pune News)

शहरातील प्रमुख विसर्जन मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत सुमारे 559 गणपती मंडळांनी भाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक शांततेत पार पडली. पुण्यातील मिरवणूक पाहण्यासाठी येणार्‍या

भक्तांची गर्दी चौपट वाढल्याचे दिसून आले. तसेच, मेट्रो व पीएमपी सेवेमुळे नागरिकांची झालेली सोय याचाही परिणाम गर्दीवर दिसून आला.

शनिवारी सकाळी 9.30 वाजता महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक रविवारी रात्री 8 वाजून 12 मिनिटांनी संपली. विसर्जन मिरवणूक नेहमीपेक्षा काही तास आधी संपविण्याचे नियोजन केले होते. पण, ऐनवेळी पोलिसांनी सर्वांनाच ढील दिल्याने त्याचा परिणाम मिरवणूक लांबण्यात झाला.

टिळक चौकातील गर्दी उत्तररात्री संपूर्णपणे आटोक्यात आली होती. मात्र, गणेश मंडळांचा उदंड उत्साह आणि काही ठिकाणी झालेले वाद तसेच थकले भागलेले पोलिस कर्मचारी व अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी ही मिरवणूक लवकर आटोक्यात आणू शकले नाहीत.

रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत टिळक रस्त्यावर पन्नास मंडळे रांगेत होती. दुपारी 2 पर्यंत स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहापर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते. विसर्जन करून परत येणार्‍या प्रचंड उंचीच्या रथांमुळे अनेक रस्त्यांवर रविवारी दुपारपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अजित पवार, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती-

महात्मा फुले मंडईतील टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पोलिस आयुक्त अमितेश कुमार आदींनी टिळक पुतळ्यासमोर पुण्याचे ग्रामदैवत व मानाच्या पहिल्या कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पुण्याचे भूषण असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला प्रतिसाद देत या तिन्ही मंत्र्यांनी ढोल वादनाचा आनंद लुटला.

मानाच्या गणपतींचे एकापाठोपाठ विसर्जन

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीपाठोपाठ ग्रामदेवता व मानाचा दुसर्‍या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व हे मंडळही मिरवणुकीत सहभागी झाला. मानाचे गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे गणपतीही मिरवणुकीत सहभागी झाले. सव्वासहा तासांच्या मिरवणुकीनंतर दुपारी पावणेचार वाजता कसबा गणपतीचे विसर्जन झाले. तर इतरही मानाच्या गणपतींचे पावणेसहा वाजेपर्यंत एकापाठोपाठ विसर्जन करण्यात आले.

टिळक रस्त्यावरील मिरवणुकीत सर्वाधिक मंडळांचा सहभाग

शहरातील लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, कर्वे रस्ता आणि टिळक रस्ता या पाच प्रमुख मार्गावरील मिरवणुका नेहमीच गणेश भक्तांची गर्दी खेचणार्‍या ठरल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मोठी चुरस असते. यंदा टिळक रस्त्यावरील मिरवणुकीत सर्वाधिक म्हणजे तब्बल 210 मंडळे सहभागी झाली. त्या खालोखाल लक्ष्मी रस्ता (155), केळकर रस्ता (109), कुमठेकर रस्ता (61) तर कर्वे रस्त्यावरील मिरवणुकीत (24) मंडळांनी भाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT