पुणे: रस्त्यावर खाद्यपदार्थ शिजवण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे तुकाराम मुंढे यांचे धोरण लक्षात घेऊन येत्या गणेशोत्सवात ‘फूड झोन’ची योजना राबविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दैनिक ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत दिली. पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीस पुण्याच्या सर्वच भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर आणि उपनगरांतून सुमारे सव्वाशे मंडळांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. उत्सव अधिक चांगला, रसरशीत, विधायक, रंजक आणि लोकाभिमुख कसा करता येईल, याबाबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली, तसेच अनेक मौलिक सूचनाही केल्या.
रस्त्यावर खाद्यपदार्थ तयार करण्यास असलेल्या बंदीची उत्सव काळात कडक अंमलबजावणी झाली, तर विक्रेते आणि त्याहीपेक्षा उत्सवानिमित्त रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणाऱ्या पुणेकरांचे काय? असा प्रश्न हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांनी बैठकीत उपस्थित केला. तो धागा पकडून जगताप यांनी फूड झोनच्या प्रस्तावित योजनेची माहिती दिली. याबाबत महापालिका प्रशासन विचार करीत असून, उत्सवाच्या आधी त्याचा तपशील जाहीर केला जाईल. त्यामध्ये मंडळांचे सहकार्यही अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्याच्या गणेशोत्सवात मागील वर्षी दहा लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक आणि व्यावसायिकांची वाढती संख्या लक्षात घेता खाद्यविक्रेत्यांना एका नियोजित जागेत आणल्यास रस्त्यांवरील गर्दी व वाहतुकीचा अडथळा कमी होण्यासह नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित खाद्यपदार्थ उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
टिळक रस्त्यावरील मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी उत्सवाआधीच एक योजना तयार करण्यात आली होती आणि त्याला पुणे पोलिस, तसेच मंडळांचा सहयोग लाभला होता. प्रत्यक्षात मात्र मिरवणुकीत हे नियोजन साफ फसले. हे असे का झाले, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. तसेच, उत्सव काळात लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून पूर्व भागात जाण्यास गेल्या अनेक वर्षांपासून बंदी घालण्यात आली असल्याने भाविक पूर्व भागातील मंडळांपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. त्यामुळे या भागातील मंडळांवर अन्याय होतो. याबाबतही पोलिसांनी गेल्या वर्षी आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही. परिणामी, मंडळांची फसवणूक झाली, असा आरोपही मंडळांकडून करण्यात आला.
बदलत्या काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरूप अधिक विधायक आणि शिस्तबद्ध कसे करता येईल, यावर ‘पुढारी’ आयोजित या बैठकीत विचारमंथन झाले. विशेषतः डीजेचा वाढता वापर, ध्वनिप्रदूषण आणि उत्सवातील शिस्त याबाबत काय उपाययोजना करता येतील ?, यावरही या वेळी साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
जगताप म्हणाले, की सामाजिक जाणिवांबाबत वर्षभर उपक्रम राबवावेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये एखादा सामाजिक विषय हाती घेऊन तो तडीस नेण्याची मोठी ताकद आहे. पुण्यात सुरू झालेल्या अनेक विधायक उपक्रमांचे अनुकरण राज्यासह देश-विदेशात केले जाते. त्यामुळे पुण्यातील गणेश मंडळांनी पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर आदर्श निर्माण करावा. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता पर्यावरण आणि सामाजिक परिवर्तनाची व्यापक चळवळ बनावी, ही आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ उत्सवात उत्साहाने कार्यरत असलेले आणि ‘पुढारी’च्या बैठकीलाही न चुकता उपस्थित राहणारे निंबाळकर तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. ‘पुढारी’च्या गतवर्षीच्या बैठकीत त्यांना व्यासपीठावर मानाने बसवून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. त्यांची उणीव आजच्या बैठकीत प्रकर्षाने सर्वांनाच जाणवली. त्यांना बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन निवासी संपादक सुनील माळी यांनी केले.
गणेशोत्सव अधिक विधायक करण्यासाठी ‘या’ अपेक्षा
अमली पदार्थांविरोधात गणेश मंडळांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी.
व्यसनमुक्तीसाठी पोस्टर्स, फलक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांसह स्वतंत्र एसओपी तयार करावी.
गणेश मंडळांच्या विधायक आणि सामाजिक कार्याला अधिक प्रसिद्धी मिळावी.
पूर्व भागातील चांगले काम करणाऱ्या मंडळांना प्रसिद्धीचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.
गणेशोत्सवातील चांगल्या उपक्रमांची नोंद घेणारे स्वतंत्र नियतकालिक किंवा मुखपत्र काढावे.
गणेशोत्सव केवळ साउंड आणि मिरवणुकीपुरता मर्यादित न ठेवता दहा दिवसांच्या विधायक उपक्रमांवर भर द्यावा.
स्थानिक कलाकारांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून योग्य व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.
नवीन पिढीतील कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
उत्सवातील उन्माद कमी करून धार्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्य जपावे.
सामाजिक आणि समकालीन प्रश्नांवर आधारित देखाव्यांना प्राधान्य द्यावे.
मुलांवर संस्कार घडविणाऱ्या स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करावे.
वस्त्यांच्या विकासासाठी गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रमांवर अधिक भर द्यावा.
गणेशोत्सवात डीजेचा वापर कमी करून पारंपरिक स्वरूपाला प्राधान्य द्यावे.
गणेशोत्सव काळात दारूवर बंदी घालण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.
उत्सव काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात.
विसर्जन मिरवणूक मार्गावर आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था करावी.
मंडळांच्या मंडपांना वीज कनेक्शन मिळण्याबाबतच्या अडचणी दूर कराव्यात.
... या मान्यवरांनी व्यक्त केली मते
डॉ. मिलिंद भोई, आनंद सराफ, उदय जगताप, संदीप गायकवाड, ॲड. शिरीष शिंदे, मोहनीश सावंत, राहुल भालेराव, सूर्यकांत पाठक, सुनील ढमाले, श्याम मानकर, बाळासाहेब अमराळे, अमित जाधव, प्रमोद कोंढरे, दत्ता सागरे, भाऊ करपे, रवींद्र माळवदकर, शैलेश पाटील, पुरुषोत्तम नांगरे, राकेश डाखवे आदी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी, शहराच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे आपली मते दै. ‘पुढारी’कडे व्यक्त केली.