पुणे: रस्ता पेठ आणि नाना पेठ या भागातील गणेश मंडळांनी उभारलेले देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी पोलिस प्रशासनाकडून शिवाजी रस्त्यावरच, विशेषतः बेलबाग चौक परिसरात रोखली जात आहे. यामुळे गणेशभक्तांना पूर्वेकडील देखावे पाहण्यासाठी जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप या भागातील काही मंडळांकडून करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असून, पोलिसांनी बेलबाग चौकातून पूर्व भागाकडे येणारा रस्ता बॅरिकेड लावून अडवू नये, अशी आक्रमक मागणी गणेश मंडळांनी केली आहे.
पाहणीदरम्यान बेलबाग चौकातील स्थिती अशी दिसली
दरम्यान, पूर्व भागातून (नाना, रास्ता व भवानी पेठेकडून) बेलबाग चौकात येण्यास मात्र सक्त प्रतिबंध करण्यात आला आहे. बेलबाग चौकात अतिरिक्त गर्दी होऊ नये, यासाठी हा रस्ता बंद ठेवण्यात आला असला, तरी गणेश भक्तांना बेलबाग चौकाकडून पूर्व भागात जाण्यासाठी पूर्ण मुभा असल्याचे या वेळी दिसले आणि पोलिसांनीही याबाबत बोलताना तसे स्पष्ट केले आहे.
दै. 'पुढारी'च्या पाहणीतील वास्तव...
या सर्व पार्श्वभूमीवर दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधीकडून शनिवारी (दि. १९) मध्यवर्ती भागाची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले की, दगडूशेठ दत्त मंदिराशेजारून पूर्व भागात जाण्यासाठी एक छोटा रस्ता उपलब्ध होता. मात्र, रामेश्वर चौकातून शिवाजी रस्त्याने दगडूशेठ गणपती आणि दत्त मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर पोलिसांनी नागरिकांना बंदी घातली होती. त्यामुळे या रस्त्याचा वापर दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्यांनाच पूर्व भागात जाण्यासाठी होत होता, तर शिवाजी रस्त्याने आलेल्यांना याचा लाभ होत नसून, त्यांना रामेश्वर चौकातून पूर्वेकडे जाता येत आहे.
या भागांमधून पूर्व भागात सहज प्रवेश...
याशिवाय, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, रामेश्वर चौक, लालमहाल चौक (कसबा पेठ) आणि खडक पोलिस लाइन रस्ता या पर्यायी मार्गांचा वापर करून गणेशभक्तांना पूर्व भागात सहज प्रवेश करता येत असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले.
मंडळांनी केलेले आरोप चुकीचे असून, त्यात कोणतेही तथ्य नाही. बेलबाग चौक आणि बुधवार चौकाकडून (पासोड्या विठोबा मंदिर) पूर्व भागात जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे खुला आहे. बेलबाग चौकातील प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी केवळ पूर्व भागातून येण्यास बंदी केली आहे. पूर्व भागात जाण्यासाठी नागरिकांना कोणतीही बंदी घातलेली नाही.कृषिकेश रावळे, पोलिस उपायुक्त