Ganesh Idol Immersion
पुणे : गणपती विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल यांसह विविध जलस्रोतांमध्ये तरंगत्या, अर्धवट तरंगत्या किंवा संकलित केलेल्या गणेश मुर्तींचे फोटो/ व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या छायाचित्रांमुळे धार्मिक भावना दुखावण्याची तसेच सार्वजनिक शांततेस बाधा येण्याची शक्यता असल्याने शहर पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. हा मनाई आदेश 15 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
दरम्यान, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी (दि.5) पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथील गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा बंदोबस्ताचा आढावा घेतला. पाषाण रोड येथील बिनतारी संदेश विभागाच्या ज्ञानेश्वरी सभागृहात ही बैठक पार पडली. या वेळी पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठकीत शुक्ला यांनी बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या. वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन सोहळ्यासाठी पुणे शहरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रथेप्रमाणे विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा प्रारंभ आज शनिवारी (दि.6 सप्टेंबर) मंडईतील टिळक पुतळा परिसरातून होणार आहे.
यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास अगोदर म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी मानाच्या मंडळांसाठी वेळापत्रक तयार केले आहे. वेळापत्रकानुसार मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून वेळेत विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि.5) बैठक घेतली. बैठकीत शुक्ला यांनी बंदोबस्ताचा आढावा घेऊन सूचना केल्या. विसर्जन मार्गावर ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असणार आहे.
मिरवणूक सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर प्रमुख चौकात उभे केले जाणार आहेत. गर्दीतील चोरी, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह विविध विसर्जन मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.