पुणे: 'गणरायाच्या नैवेद्यातही भेसळ अजिबात चालणार नाही...!' हातात भिंग घेऊन मोदकाची तपासणी करणारे तुकाराम मुंढे... तर दुसरीकडे, 'नियम हे मोडण्यासाठी नसतात; ते समाजाच्या कल्याणासाठी, शिस्त आणि सुव्यवस्थेसाठी असतात...', असा संदेश देणारे जिवंत देखावे! सादर करत गणेशोत्सवात यंदा पुण्यातील गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनाचा सूरही बुलंद केला आहे.
अन्नातील भेसळीविरोधातील कारवाई आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी चर्चेत असलेल्या राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची कार्यशैली श्रीगणेश मंडळांच्या देखाव्यांचा विषय ठरली आहे.
कुठे व्यंगचित्रातून भेसळीवर मिश्कील भाष्य, तर कुठे जिवंत देखाव्यातून कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला सलाम; त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात तुकाराम मुंढे यांचा 'जलवा' मंडळांच्या देखाव्यांतून पाहायला मिळत आहे.
अन्नातील भेसळ रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर धडक कारवाया सुरू असून, नियम न पाळणाऱ्या हॉटेल्स, दुकाने आणि खाद्य आस्थापनांवर कारवाई केली जात आहे.
अन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी सुरू असलेल्या या तपासण्यांमुळे आणि विविध मुलाखतींमुळे मुंढे चर्चेत आहेत. त्यांची निर्भीड कार्यशैली तसेच नागरिकांनी स्वतः जागरूक राहून भेसळ रोखण्यासाठी काय करावे, याचे चित्रण पुण्यातील काही मंडळांनी देखाव्यांतून केले आहे.
मॉडेल कॉलनीतील अजिंक्य मित्रमंडळाने 'सुरक्षित अन्न आणि सुरक्षित महाराष्ट्र' हा विषय घेतला आहे. अन्नातील भेसळ रोखणे, नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी यावर जिवंत देखाव्यातून भाष्य केले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा संदर्भ घेत शिस्त, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाचा संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बालकलाकार हा देखावा सादर करीत आहेत. देखाव्यातून अन्नातील भेसळ आणि ती ओळखण्याच्या सोप्या पद्धती दाखविल्या जात आहेत. तसेच, माहिती पुस्तिकेचेही वाटप करण्यात येत आहे, असे मंडळाचे संचालक उमेश शेवते यांनी सांगितले.
व्यंगचित्रे आणि स्केचद्वारे मांडली संकल्पना
बुधवार पेठेतील वीर हनुमान मित्रमंडळाने तुकाराम मुंढे यांच्या कार्याला पाठिंबा देणारा देखावा साकारला आहे. भ्रष्टाचारमुक्त, निःस्वार्थपणे काम करणाऱ्या आणि अन्नातील भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, हा संदेश दिला आहे. व्यंगचित्रे आणि स्केचद्वारे ही संकल्पना मांडली आहे.
मुंढे हातात भिंग घेऊन गणरायाच्या नैवेद्यातील मोदकाची तपासणी करताना दाखविले आहेत. देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादातही भेसळ होऊ नये, याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आनंद सागरे यांनी सांगितले.