Fursungi Tobacco Factory Pudhari
पुणे

Fursungi Tobacco Factory: घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! मध्य प्रदेशातील कामगार अटकेत; मालक पसार

३१ लाख ९१ हजार ६०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राहत्या घरातच पॅकिंग मशिन लावून सुगंधित तंबाखूचा कारखाना थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातून आलेल्या दोघांकडून साध्या तंबाखूमध्ये गुलाबपाणी, मेंथॉल आणि ग्लिसरॉल मिसळून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार केली जात होती.

तर, अमूलच्या नावाचा वापर करून बनावट चिज बनवले जात होते. फुरसुंगीतील उरुळी देवाची परिसरात गुन्हे शाखा आणि अन्‍न व औषध प्रशासनाने संयुक्त छापा टाकून हा ‘घरगुती तंबाखू कारखाना’ उद्ध्वस्त केला.

या कारवाईत ५९ बॉक्स सुगंधित तंबाखू, पॅकिंग मशीन, कच्चा माल आणि अमूल कंपनीच्या नावाचे १,०८० चीजचे डबे असा ३१ लाख ९१ हजार ६०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुशीलसिंग विश्वनाथ तोमर (२६) आणि उमेशसिंग रामदीन तोमर (२३, रा. दोघेही मुरैना, मध्य प्रदेश) यांना अटक केली आहे. तर, कारखान्याचा मालक यासीन सईद खान ऊर्फ साजीद हा फरार आहे.

दोघेही उरुळी देवाची येथील घरात राहून प्रतिबंधित तंबाखू तयार करत होते. साध्या तंबाखूमध्ये सुगंधित द्रव्ये मिसळल्यानंतर पॅकिंग मशिनच्या साहाय्याने त्याची पाऊचमध्ये पॅकिंग केली जात होती. तयार माल बाजारात विक्रीसाठी पाठवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. उरुळी देवाची परिसरात सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, घरातच तंबाखू तयार केला जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अन्‍न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती देऊन संयुक्त कारवाई करण्यात आली. संबंधित घर पुन्हा वापरले जाऊ नये, यासाठी ते सील करण्यात आले.

या तंबाखूसाठी कच्चा माल कुठून आणत होते, तयार माल कोणाला पुरवला जात होता आणि एका नामांकीत कंपनीच्या नावाने बनावट चीज विक्रीसाठी कोठे पाठवणार होते, याचा तपास सुरू आहे.

युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (पुणे विभाग) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुणे कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (अन्‍न) नारायण सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नम्रता मोहिते व पूजा बगाडे यांनी ही धडक कारवाई केली.

४३० किलो बनावट चीज जप्त

याच कारवाईत एका नामांकित कंपनीचे बनावट लेबल लावलेला आणि मुदतबाह्य तारखेत फेरफार केलेला ४३० किलो चीजचा साठाही जप्त करण्यात आला. त्याची किंमत दोन लाख ५७ हजार १६४ रुपये आहे. मुदतबाह्य तारीख नष्ट करून त्यावर नवीन तारीख टाकण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळले. चीजचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT