पुणे: अहिल्यानगरच्या मोसंबी आणि संत्रीला गोडी आली असून, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात या फळांची आवक वाढली आहे. ग्राहकांचा आंबट-गोड संत्री खरेदी करण्याकडे कल जास्त आहे. परिणामी, संत्रीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने मोसंबीच्या भावात घट झाल्याचे चित्र बाजारात दिसून आले.
उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांची पावले फ्रुट स्टॉल, सरबत विक्रेते तसेच रसवंतिगृहाकडे वळू लागली आहेत. परिणामी, बाजारात कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्षे, चिकू यांसारख्या रसाळ फळांची मागणी वाढली आहे. या फळांची आवकही मोठी असल्याने दर स्थिर आहेत.
उष्णतेमुळे गळती वाढल्याने चिकूची आवक वाढली आहे. दरम्यान, व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळीत असल्याने हॉटेल-खानावळीतून लिंबाच्या मागणीत घट कायम आहे. बहुतांश फळांची आवक-जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत.
फळबाजारात रविवारी (दि. 29) मोसंबीची 30 ते 40 टन, संत्रा 3 ते 4 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 10 ते 12 टेम्पो, लिंबाची सुमारे 800 ते 1 हजार गोणी, कलिंगड 50 ते 60 गाड्या, खरबूज 25 ते 30 टेम्पो, चिक्कू 2 ते 3 हजार गोणी, पेरु 100 ते 125 क्रेट, अननस 6 ट्रक आणि द्राक्षांची 35 ते 40 टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 500-1800, मोसंबी : (3 डझन) : 150-320, (4 डझन) : 40-120, संत्रा : (10 किलो) : 400-1800, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-250, आरक्ता : 10-60, गणेश : 10-30, कलिंगड : 5-13, खरबूज : 10-25, पपई : 5-15, चिकू (दहा किलो) : 100-500, पेरु (20 किलो) : 400-600, अननस (1 डझन): 100-600, द्राक्षे : (15 किलो) : 500-1200, हापूस (4 ते 7 डझन) कच्चा 8000-12000.