Pune Karandikar Memorial Lecture
पुणे : राष्ट्रीय सुरक्षा आणि पत्रकारिता हे दोन वेगळे विषय वाटत असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेले आहेत. देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सुरक्षित राष्ट्र जितके आवश्यक आहे, तितकीच मुक्त, जबाबदार आणि सजग प्रसारमाध्यमेही आवश्यक आहेत. माहिती युद्ध, डीपफेक, एआय आधारित चुकीची माहिती आणि सोशल मीडियावरील अफवांच्या या युगात पत्रकारांनी जबाबदारी, संयम, सत्यता पडताळणी, लवचिकता आणि प्रजासत्ताक मूल्ये या 'फाइव्ह आर’ सूत्राचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केले.
लष्कर आणि माध्यमांनी एकमेकांकडे संशयाने नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी परस्पर विश्वास, समन्वय आणि जबाबदारीच्या भावनेतून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यान’ कार्यक्रमात ते ‘राष्ट्रीय सुरक्षा व माध्यमांची भूमिका’ या विषयावर बोलत होते.
या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना जनरल पांडे म्हणाले की, युद्धाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. पारंपरिक युद्धासोबतच आता हायब्रीड वॉरफेअर, नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेअर आणि माहितीच्या आघाडीवरील युद्ध अधिक प्रभावी झाले आहे. समाजामध्ये अविश्वास, भीती आणि तणाव निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती, डीपफेक व्हिडीओ, फेरफार केलेली छायाचित्रे आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टचा वापर केला जात आहे.
त्यांनी सांगितले की, आज लष्करी मोहिमांच्या केंद्रस्थानी ‘इन्फॉर्मेशन ऑपरेशन्स’ आले आहेत. एखादी चुकीची माहितीही राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करू शकते.माहितीची पोकळी निर्माण झाली तर ती अफवांनी भरली जाते.
लष्करी कारवायांचे किंवा संवेदनशील घटनांचे वार्तांकन करताना पत्रकारांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी पत्रकारांसाठी 'फाइव्ह आर’ सूत्र मांडले :
- रिस्पॉन्सिबीलिटी (जबाबदारी) — माहिती देताना सामाजिक आणि राष्ट्रीय परिणाम लक्षात घेणे
- रिस्ट्राईन्ट (संयम) — संवेदनशील घटनांमध्ये सनसनाटीपणा टाळणे
- वेरिफिकेशन ऑफ ट्रुथ (सत्यता पडताळणी) — माहितीची खातरजमा करूनच प्रसारित करणे
- रेसिलिन्स (लवचिकता) — बदलत्या परिस्थितीत शांतपणे आणि सक्षमपणे काम करणे
- रिपब्लिक व्हॅल्यूज (प्रजासत्ताक मूल्ये) — लोकशाही, संविधान आणि राष्ट्रीय हित जपणे
- आपल्या देशात राष्ट्रीय सुरक्षा, लष्करी ऑपरेशन आणि प्रसारमाध्यमांची पारदर्शकता याबाबत सतत सतर्क राहणे आवश्यक आहे कारण दोघेही एकमेकांशी जोडले आहेत.
- मजबूत लोकशाहीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
- अलीकडच्या काळात फेकन्युज चे प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्याला तोंड देणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. त्यासाठी परंपरागत प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते.
- संयम ठेवून सत्यता तपासणे आणि त्यानंतर बातमी प्रसारित करणे यासाठी वेळ कमी पडतो हे जरी खरे असले तरी ते केलेच पाहिजे तीच खरी पत्रकारिता आहे.
- व्हायरल झालेले व्हिडिओ, बातम्या किती खऱ्या किती खोट्या? हे तपासणे मोठे कठीण होऊन बसले आहे.आपण जेव्हा विकसित भारत म्हणतो तेव्हा सत्यता पडताळून मगच बातम्या देणे देशहिताचे आहे.
- आता युद्धाचे स्वरूप बदलले आहे हायब्रीड युद्ध होत आहे, प्रत्यक्ष सीमेवर न जाता स्पेस मध्ये ते होत आहे. त्यासाठी फ्युचर रेडी होणे आवश्यक आहे
- पूर्वी सैन्य दलासाठी इन्फॉर्मेशन सेंटर महत्त्वाचे नव्हते मात्र आता ते खूप महत्त्वाचे झालेले आहे. त्यात माध्यमाची भूमिका महत्वाची आहे.
-आंतरराष्ट्रीय धोरणे,त्याचा परिणाम याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
-डिपफेक, मॅन्युफॅक्चर नरेटिव्ह,डिजिटल डिस इन्फॉर्मेशन यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- ऑपरेशन सिंदूर,रशिया- युक्रेन आणि आता अमेरिका -इराणच्या युद्धात हे सर्व आपण पाहत आहोत.
- 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यामधील लाईव्ह रिपोर्टिंग नी आपल्याला हेच दाखवून दिले आहे.
- त्यासाठी प्रसारमाध्यमांनी जबाबदारी, संयम, घटनात्मक मूल्य आशा पाच प्रकारच्या फ्रेमवर्कवर लक्ष देणे गरजेचे आहे.
- सनसणाटी बातमी देण्याच्या घाईत आपण चुकीचे काही देत नाही ना ? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
- शब्द,व्हिजवल,हेडलाईन महत्त्वाचे आहेच,त्याहीपेक्षा संयम महत्त्वाचा आहे.संयम म्हणजे दुर्बलता नव्हे हे समजलं पाहिजे.
- सध्या सर्वत्र सोशल मीडियाचा बोलबाला आहे. काही वेळा हा सोशल मीडिया परंपरागत प्रसार माध्यमे आणि डिजिटल मीडियालाही मागे टाकतो. अशावेळी बातमीची सत्यता तपासणे हे खूप कठीण काम होऊन बसले आहे.
- युद्धाच्या वेळी अशा बातम्यांना पायबंध घालणे हे किचकट काम आहे.
-प्रत्येकाच्या हातात मोबाईल सारखे स्मार्ट यंत्र असल्याने फेक न्यूजचेही प्रमाण वाढले आहे.त्याची सत्यता पडताळण्याची गरज आहे.
- अशा वेळी प्रसार माध्यमाचा संयम महत्त्वाचा ठरतो
- संवेदनशीलता आणि संयम ही महत्त्वाची शस्त्रे आहेत त्याचा पत्रकारांनी वापर केला पाहिजे
- बातम्यांचा प्रचंड वेग आणि अचूकता याचा समन्वय साधण्याची गरज आहे.
यावेळी माजी लष्कर प्रमुख पांडे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली स्वतःचे आत्मचरित्र लिहिणार का? माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाबद्दल आपले मत काय? या प्रश्नांवर त्यांनी भाष्य करणे टाळले. मात्र पत्रकारांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.