Pune Bribery Case
पुणेः शेतजमिनीच्या पंचनाम्याच्या कामासाठी लाच मागणार्या ग्राम महसूल अधिकारी महिलेस ७ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजीराजे चौक, नाव्हरा-तळेगाव रोडवर शुक्रवारी (दि.16) ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्राम महसूल अधिकारी प्रमिला नागेश वानखेडे (वय ४२) असे कारवाई करण्याच आलेल्या महिला अधिकार्याचे नाव आहे. याबाबत ५६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांची शिरसगाव काटा येथे वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलांनी तोंडी वाटप करून दिलेल्या त्यांच्या हिस्स्याच्या शेतजमिनीची लेव्हल करत असताना भावासोबत वाद झाला होता. त्यानंतर ९ जानेवारी रोजी तलाठी कार्यालयाकडून शेताचा पंचनामा करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
१२ जानेवारी रोजी तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले असता, आरोपी लोकसेविका वानखेडे यांनी 'तुमच्या बाजूने पंचनामा करून देण्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील,' अशी थेट लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता, तडजोडीअंती लाचेची रक्कम ७ हजार रुपये निश्चित करण्यात आली.
त्याच दिवशी छत्रपती संभाजीराजे चौक, नाव्हरा–तळेगाव रोड येथे सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष तक्रारदाराकडून ७ हजार रुपये स्वीकारताना अधिकारी महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.