पुणे : पुण्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहेत. या अतिक्रमणांमुळे शहरे बकाल होत आहे. याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर देखील होत असल्याने शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. तर गुरुवारी (दि ८) गोयल गंगा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली.
पुणे शहरात विविध भागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. रस्त्यावर व पदपथांवर दुकाने टाकून व्यवसाय करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करत पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. अखेर पालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर अतिक्रमण विभागाला जाग आली.
बुधवारी फर्ग्युसन रस्त्यावर कारवाई करत सुमारे ६ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले होते. या रस्त्यावरील नामांकित हॉटेल्स तसेच दुकानांनी केलेले अतिक्रमण देखील कारवाईतून सुटले नाहीत. जेसीबीच्या साह्याने हे अतिक्रम काढून टाकण्यात आले. तर गुरुवारी गोयल गंगा रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विकास विभाग यांच्या मार्फत संयुक्त कारवाई करून काढून टाकण्यात आली. गोयल-गंगा रस्त्यावर रस्ता व पदपथावरील तसेच इमारतीच्या फ्रंट व साइड मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली.
अतिक्रमण निरीक्षक तसेच १४ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बल व ५५ बिगारी सेवक इतर सेवक व ६ ट्रक आदी मार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ६ हजार स्के.फूट कच्चे, पक्के शेड मोकळे केले. तसेच टेबल, खुर्च्या, टेंट, काऊंट तसेच पथारी साहित्य जवळपास सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे. येत्या काळात देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण विभागाने सांगितले.