पिंपरी : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवून एका वाहनाला धडक दिल्यानंतर कार डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर रविवारी (दि. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. यावेळी संबंधित चालकाने ‘तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे,’ असे म्हणत पोलिसांशी अरेरावी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाकड पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. शशांक प्रशांत खानवलकर (४०, रा. औंध) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानवलकर हा मद्यधुंद अवस्थेत औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर वाहन चालवत होता. वाहन चालवत असताना त्याच्या कारची अन्य एका वाहनाला धडक बसली. त्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील डिव्हायडरवर जाऊन आदळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून खानवलकर याला मद्यधुंद अवस्थेत तसेच इतर वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन चालवू नये, असे सांगत समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी खानवलकर याने पोलिसांना उद्देशून शिवीगाळ केली. तसेच ‘तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे,’ असे म्हणत पोलिसांशी वाद घातल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केलेल्या चित्रीकरणात दिसून येत आहे.
दरम्यान, त्याने पोलिसांच्या अंगावर जाण्याचाही त्याने प्रयत्न केल्याचेही दिसून आले. या संपूर्ण प्रकाराचे काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यामध्ये खानवलकर हा पोलिसांशी मोठ्या आवाजात बोलताना आणि त्यांच्यावर विविध आरोप करताना दिसत आहे. ‘मी मराठी आहे... तुम्हाला लाज वाटते का?’ असे म्हणत तो पोलिसांशी वाद घालत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून आले.
व्हायरल व्हिडीओची पोलिसांकडून दखल
या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर वाकड पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. खानवलकर याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला नोटीस बजावण्यात आल्याचे वाकड पोलिसांकडून सांगण्यात आले.
आधी दादागिरी नंतर दिलगिरी
या घटनेनंतर काही तासांनी खानवलकर याने स्वतःचा एक व्हिडिओ तयार करून पोलिसांची जाहीर माफी मागितली. घटनेच्या वेळी आपल्याकडून झालेले वक्तव्य चुकून झाल्याचे सांगत त्याने आपल्या वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 'मी जे बोललो ते अनावधानाने झाले,’ असे त्याने माफीच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांशी हुज्जत घालण्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर माफी मागितल्याचा व्हिडिओ, असे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.