पुणे

Pune Drug Case : ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन पोलिसांना बेड्या

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित पाटीलने ससून रुग्णालयात दाखल असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता. या प्रकरणात आता कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखाच्या युनिट २ ने पोलिस कर्मचारी नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोघांना शुक्रवारी अटक केली आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी ललितच्या साथीदारासह ससून रुग्णालयाच्या कामगाराला उपाहारगृहातील अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.

तपासात ससूनच्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेणारा ललित अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपचार घेणाऱ्या ललितला नोटीस बजाविण्यात आली. त्याला ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असतानाच २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तांवरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला. या वेळी जाधव आणि काळे हे दोघेही ससून रुग्णालयात बंदोबस्तावर होते. काळे याने आरोपी हाताला हिसका देऊन पळून गेले, असे सांगितले होते.

मात्र, त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ललित पाटील हा आरामात रस्त्याने चालत जात असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे ललित पाटील पसार झाल्यानंतर लेमन ट्री हॉटेलमध्ये गेला होता. त्याच हॉटेलमध्ये थोड्यावेळाने पोलिस कर्मचारीही दिसून आल्याने बंदोबस्तावरील पोलिस संशयाच्या भोवऱ्यात आले होते. चौकशीत दोषी आढळलेल्या एक सहायक निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि सात पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (दि. १७) ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलिस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली.

शुक्रवारी नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांना १ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपी ललित पाटील पळून गेल्यानंतर काळे आणि जाधव यांनी कण्ट्रोल रूमला तीन तास उशिरा कळविले. अधिक तपास करायचा असल्याने सरकारी पक्षाच्या वतीने काळे आणि जाधव यांची ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने काळे आणि जाधवला १ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT