पुण्यात रॅकेट सुरू असल्याचा पोलिसांचा संशय  File Photo
पुणे

Pune Drugs Case | शहरातील अन्य बार, पबमध्ये आरोपींनी ड्रग पुरविल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील ‘लिक्विड लिझर लाउंज’ (एल-3) बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टी प्रकरणातील बार मालक, चालक, पार्टी आयोजक यांसह अमली पदार्थ आरोपी या सर्वांनी मिळून पार्टीचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी शहरातील अन्य बार, पबमध्ये ड्रग दिले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने सर्व आरोपींकडे एकत्रित तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत 2 जुलैपर्यंत वाढ केली.

आरोपींची नांवे

बारच्या जागेचे मालक संतोष विठ्ठल कामठे (रा. रंजनीगंध अपार्टमेंट, शिवाजीनगर), बार चालविण्यासाठी घेतलेले उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवी माहेश्वरी (रा. उंड्री), पार्टीचे आयोजन केलेला अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डिजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर), मानस पस्कूल मल्लिक (वय 33, रा. येरवडा), नितीन नथुराम ठोंबरे (वय 34, रा. गोरेगाव इस्ट), करण राजेंद्र मिश्रा (वय 34, रा. मुंढवा) अशी कोठडीत वाढ झालेल्यांची नावे आहेत. एल-3 बारमध्ये पहाटे उशिरापर्यंत सुरू असल्याचे, तसेच तेथे अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

रॅकेट सुरू असल्याची शक्यता

न्यायालयात युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. वेंगुर्लेकर म्हणाल्या की, एल-3 बारमधील पार्टीमध्ये एमडी ड्रग वापरल्याची माहिती अभिषेक सोनावणे याने पोलिसांना दिली आहे. याखेरीज, ठोंबरे आणि मिश्रा याने अभिषेक सोनावणेकडून ड्रग घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अन्य आरोपींनीही सोनावणेकडून ड्रग घेतल्याची शक्यता असून, इतर अटक आरोपींकडून चरस, गांजा, एमडी सारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

ते त्यांनी कोठून आणले, त्यांना कोणी दिले तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा तपास करायचा असल्याचे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. वेंगुर्लेकर व तपासी अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी केली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. राजेश कातोरे, अ‍ॅड. संजीव कुमार, अ‍ॅड. अमेय बलकवडे, अ‍ॅड. आर. एल. मते यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासात प्रगती दिसत आहे, हे सगळे रॅकेट असल्याची शक्यता आहे, सगळ्या आरोपींची भूमिका वेगवेगळी पाहता येणार नसल्याचे सांगत आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली.

या गोष्टींचा होणार तपास

आरोपींनी पार्टी करण्याच्या कट कोठे व कधी रचला. त्यांना अमली पदार्थ पुरविणारे ड्रग पेडलर, त्यांच्या मुख्य म्होरक्या कोण आहे. सर्व आरोपींकडे ड्रग्स पुरविणारे, आजपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ड्रग पार्ट्या संदर्भात पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT