पुणे : हृदयशस्त्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून एका प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञासह त्यांच्या साथीदारांवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विजय मधुकर जायभाये (वय ४४, रा. चिंचोली चौक, बुलडाणा) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डाॅ. रणजित जगताप यांच्यासह सहकाऱ्यांविरुद्ध शस्त्रक्रियेत निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डाॅ. जगताप यांचे वानवडी भागात राममंगल नावाने रुग्णालय आहे. विजय जायभाये यांची आई लीलावती (वय ६२) यांना १९ ऑक्टोबर 2024 रोजी हृदयशस्त्रक्रियेसाठी (बायपास सर्जरी) रुग्णालयात दाखल केले होते. शस्त्रक्रियेदरम्यान लीलावती यांचा मृत्यू झाला. डाॅ. जगताप आणि सहकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप जायभाये यांनी फिर्यादीत केला होता. याप्रकरणी पोलिस व वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने चौकशी केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.