पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयाने फटाके विक्री आणि वाजवण्यासंबंधी नियम जाहीर केले आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये रात्री १० ते सकाळी 6 या वेळेत फटाके वाजवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
पोलिसांनी जाहीर केलेल्या नियमांनुसार, 'अॅटमबॉम्ब' या नावाने ओळखल्या जाणार्या विशिष्ट स्फोटक फटाक्यांच्या उत्पादनावर आणि जवळ बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही नागरिकाला रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनी निर्माण करणारे फटाके वाजवता येणार नाहीत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांच्या 100 मीटर परिसरात म्हणजेच शांतता प्रभागात कोणत्याही वेळेत फटाके वाजवण्यास सक्त मनाई आहे.
विक्रेत्यांसाठीही नियम कडक केले आहेत. पुणे शहरात 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या काळातच तात्पुरते विक्री परवाने वैध असतील. रस्त्यापासून 10 मीटर अंतराच्या आत किंवा महामार्ग/पुलावर फटाके फोडणे, फेकणे किंवा अग्निबाण उडवण्यासही मनाई केली आहे. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा चार मीटर अंतरावर 125 डेसिबलपेक्षा जास्त नसावी, या नियमाची विक्रेत्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.