Graduate Teacher Constituency Election Pudhari
पुणे

Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान

२९ सप्टेंबरला अधिसूचना; ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज, २७ ऑक्टोबरला मतमोजणी; २६ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.

निवडणूक कार्यक्रम आणि आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील प्रतिनिधी प्रत्यक्ष, तर सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते. पाचही जिल्ह्यांतील निवडणूक प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिकांचे अधिकारीही उपस्थित होते.

या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत नवीन मतदार नोंदणीची संधी उपलब्ध आहे. मात्र, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या १० दिवस आधीपर्यंत दाखल झालेल्या नवीन मतदार नोंदणी अर्जांवर कार्यवाही करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. मतदार नोंदणीसाठीचे अर्ज पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे जमा करावेत. संबंधित अधिकाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयांत उपलब्ध आहे.

जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर आणि ५१ हजार ७५० शिक्षक मतदार होते. त्यानंतर झालेली मतदार नोंदणी तसेच २६ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या नोंदणीमुळे अंतिम मतदारसंख्येत बदल होणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून घेतली जाते. त्याबाबत निवडणूक प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक कागदपत्रे, छाननी, निवडणूक खर्चाची मर्यादा आणि अन्य नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले.

..असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • अधिसूचना : २९ सप्टेंबर २०२६

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ६ ऑक्टोबर

  • अर्जांची छाननी : ७ ऑक्टोबर

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर

  • मतदान : २३ ऑक्टोबर, सकाळी ८ ते दुपारी ४

  • मतमोजणी : २७ ऑक्टोबर

  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण : ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT