पुणे: सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे विभागातून उत्सव विशेष 50 गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या गाड्यांच्या दोन महिन्यांच्या कालावधीत 989 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना यंदा गर्दीने खचाखच भरलेल्या गाड्यांमधून प्रवास करण्यापासून सुटका मिळणार आहे.
दरवर्षी दसरा, दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. त्यापार्श्वभूमीवर यंदा प्रथमच पुणे विभागातून मोठ्या प्रमाणावर उत्सव विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. याबाबत रेल्वेचे विभागीय वाणिज्य अधिकारी हेमंतकुमार बेहरा म्हणाले, येण्यासाठी 25 आणि जाण्यासाठी 25 अशा एकूण 50 उत्सव विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दि. 24 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या दोन महिन्यांच्या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त या उत्सव विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या दानापूर, गोरखपूर, दिल्ली, नागपूर, कोल्हापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई झांशी, लातूर, संगानेर, कलबुर्गी, अजमेर, गाझीपूर, हिसार, बिकानेर, साईनगर शिर्डी, गाझीपूरसह अन्य काही भागात धावणार आहेत, या उत्सव विशेष गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.