संतोष ननवरे
शेळगाव: इंदापूर तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीने सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत टायगर बायोटेक्नॉलॉजी प्रकल्प उभारला आहे. अशा प्रकारचा हा पुणे जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असल्याची माहिती सरपंच ऊर्मीला लक्ष्मण शिंगाडे व ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी दिली. प्रकिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर शेतीसिंचनासाठी केला जाणार आहे.
याबाबत जगताप यांनी सांगितले की, वैदवाडीतील नागरिकांचे आरोग्य गटराच्या पाण्यामुळे धोक्यात आले होते. या भागात दुर्गंधी तसेच अस्वच्छता निर्माण झाली होती. त्यावर उपाय म्हणून शेळगाव ग्रामपंचायतीने ओढ्यालगत बंदिस्त गटराद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प हाती घेतला. परंतु, त्यास ओढ्यालगतच्या शेतकर्यांनी विरोध केल्यामुळे वैदवाडी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत शेळगावअंतर्गत असलेल्या वैदवाडी येथील 1700 लोकसंख्येसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. सर्व कुटुंबांचे सांडपाणी बंदिस्त गटार लाइनमधून प्रकल्पाच्या ठिकाणी गोळा केले जाते. त्यावर टायगर बायोटेक्नॉलॉजी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत प्रक्रिया करून ते पाणी
पुन्हा शेतीसाठी वापरण्यात येते. प्रकल्पातून तयार होणारे वर्मी वॉश हे शेतीसाठी उपयुक्त आहे. ते शेळगावातील बागायतदार शेतकर्यांना अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीला 50 लाख रुपये खर्च आला आहे. प्रकल्प पूर्णत्वाकडे गेला आहे.
हा प्रकल्प करण्यासाठी राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे सहकार्य लाभले असे शिंगाडे व जगताप यांनी सांगितले.
प्रकल्प चालू करण्यापूर्वी शेळगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांनी सातारा जिल्ह्यातील हजार माची येथील प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे वैदवाडीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे गाव निर्मल झाले आहे.
नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान
टायगर बायोटेक्नॉलॉजी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प म्हणजे टायगर बायोफिल्टर हे एक अभिनव तंत्रज्ञान आहे. जे गांडुळांच्या साहाय्याने सांडपाण्याचे नैसर्गिक आणि प्रभावी शुद्धीकरण करते. हे तंत्रज्ञान सांडपाण्यातील 99 टक्के रोगजंतूंना नष्ट करते.
ग्रामपंचायत शेळगावने वैदवाडी येथे दैनंदिन 1 लाख 25 हजार लिटर क्षमतेचा टायगर बायोफिल्टर प्रकल्प उभारला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी करण्यात आलेला पहिला प्रकल्प आहे. यातून प्रकिया केलेले पाणी शेतीसिंचनासाठी उपयुक्त ठरणार आहे. लवकरच शेळगाव गावठाणसाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.- चंद्रकांत जगताप, ग्रामपंचायत अधिकारी, शेळगाव
शेळगाव-वैदवाडी येथील बंदिस्त गटर पाइपलाइन शेतकर्यांनी अडवली होती. त्यावर ग्रामपंचायतीने अतिशय सुंदर असा मार्ग काढत जिल्ह्यातील पहिला सांडपाणी प्रकल्प उभारला.- सचिन खुडे, गटविकास अधिकारी, इंदापूर