पुणे

पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करणार: ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांची ग्वाही

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. साबर गुन्हेगारीच्या जनजागृतीसाठी सायबर दिंडीबरोबरच वाहतूक कोंडी सोडविण्यास प्रयत्न करणार आहे, असे नवनियुक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

पोलिस अधीक्षक गोयल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम राबविली. अवघ्या चार दिवसांत 135 ठिकाणी कारवाई करून 9 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी मोहीम राबविली.

यवत, इंदापूर, वालचंदनगर, नारायणगाव, आळेफाटा, जेजुरीसह इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार आणि दारू अड्ड्यांवर छापे टाकले. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी आगामी काळात जोरदार प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यावर भर असून, व्यावसायिक आणि उद्योजकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'गुन्हेगारी टोळ्या, अवैधरीत्या पिस्तूल बाळगणार्‍या आरोपींची माहिती घेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच आगामी काळात होऊ पाहणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कृत्य करणार्‍यांची माहिती गोळा करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे,' असेही गोयल म्हणाले.

कोंडी सोडविण्यास प्राधान्य
वाहतूक कोंडीबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. गोयल म्हणाले, 'पुणे जिल्ह्यात महत्त्वाचे महामार्ग आहेत. महामार्गावर वाहनांची वर्दळ आहे. वाहतूक कोंडीची समस्या आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी विविध वाहतूकविषयक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नगर महामार्गावरील शिक्रापूर भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.'

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न
पुणे जिल्हा तसेच महामार्गांवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध यंत्रणांशी समन्वय साधून पोलिसांकडून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे गोयल यांनी सांगितले.

तरुणाईसाठी मोहीम राबविणार
गुन्हेगारी टोळ्यांकडे ग्रामीण भागातील तरुण मुले आकर्षित होऊ नयेत, यासाठी ग्रामीण पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. कॉलेज, महाविद्यालयांतील मुले अनुकरणशील असतात. अनेकदा चुकून किंवा अनवधानाने ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यामुळे त्यांना या वाटेवरून परावृत्त करण्यासाठी विशेष मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

जिल्ह्यात निघणार 'सायबर सुरक्षा दिंडी'
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांमध्ये सायबर जनजागृतीसाठी 'सायबर सुरक्षा दिंडी' काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. बसच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही जनजागृती केली जाणार आहे. या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT