ओतूर/वाडा/पिंपरखेड: पुणे जिल्ह्याला मंगळवारी पावसाने झोडपले असून माळशेज पट्टा, खेड तालुका, जुन्नर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाच्या अपडेट्स जाणून घेऊया…
खेड तालुक्यात नेकलेस धबधबा परिसरात रस्ता बंद
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शिरगाव–धूवोली येथील प्रसिद्ध नेकलेस धबधबा परिसरात डोंगराचा मोठा भाग कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड व माती आल्याने मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून लहान वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
तसेच टोकावडे–कारकुडी ते भीमाशंकर मार्गावरही मोठी दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणखी दरडी कोसळण्याचा धोका असल्याने प्रशासनाने नागरिकांना या मार्गावरून प्रवास न करण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच डोंगराळ भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
बुरसेवाडी येथील पुलावर पुराचे पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली, तर गुंडाळवाडी पुलावरूनही पुराचे पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळासाठी खंडित झाला.
मुसळधार पावसाचा फटका वाडा गावालाही बसला. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. घरातील साहित्याचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना रात्रभर जागून परिस्थितीचा सामना करावा लागला.
दरम्यान, भातलागवड केलेल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने व काही ठिकाणी लावणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतीच सुरू झालेली भातलागवड पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
बेल्हे-जेजुरी मार्गावरील वाहतूक ठप्प
जुन्नर तालुक्यातील धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वडज धरण १०० टक्के भरले आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मीना नदीपात्रात तब्बल १८,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मीना नदी घोड नदीला मिळत असल्याने शिरूर तालुक्यातील घोड नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे शिरूर तालुक्यातील चांडोह येथील बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून डिंभे धरण परिसरातही जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे गोहे खोऱ्यातील तसेच परिसरातील ओढे-नाले भरून वाहत असून, त्याचे पाणी घोड नदीत येत आहे. त्यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहत आहे.मीना नदीचे पाणी गोड नदीला मिळत असल्याने शिरूर तालुक्यात घोडनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
बुधवारी (दि.८) सकाळी साडे नऊच्या सुमारास बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तत्काळ वळवली आहे.अशी माहिती चांडोह गावचे पोलिस पाटील सुदर्शन भाकरे यांनी दिली.पुलावरून पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.नदीपात्रात मोठी पाणीपातळी असल्याने नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये आणि पुलावरून पाणी वाहत असताना धोका पत्करून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.सद्यस्थितीत या पूरपरिस्थितीमुळे काही गावांमधील दळणवळण विस्कळीत झाले असून, प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
माळशेज पट्ट्यात कोसळधार पावसाने बळीराजाचा घास हिरावला
माळशेज पट्ट्यातील सर्वच गावांच्या शेत शिवारात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कोसळधार पावसाने जुन्नर तालुक्यातील ओतूर, मढ,पिंपळगाव जोगा, डिंगोरे ,उदापूर,खामुंडी परिसरातील बळीराजाच्या आशांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की शेतजमिनींनी तलावाचे स्वरूप धारण केले असून, हिरवीगार उभी असलेली सोयाबीनसह विविध खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट कोसळले आहे.
आज सकाळी विविध ठिकाणांच्या टिपलेल्या दृश्यांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. बहुतांश शेताच्या बांधांचा मागमूसही उरला नसून, पिके पाण्याखाली गाडली गेली आहेत. माळशेज पट्ट्यातील डोंगररांगांवर अजूनही ढगांचा मुक्काम कायम असल्याने पावसाचा जोर ओसरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ओढे-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतातील पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही.
आधीच अवकाळी पाऊस, वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे, रासायनिक खते आणि औषधांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पेरणी केली होती. मात्र, निसर्गाच्या या तडाख्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची रोपे पूर्णपणे पाण्यात बुडाली असून, दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यास पिके कुजण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, पुढील दोन-तीन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर संपूर्ण पिके नष्ट होऊन दुबार पेरणीशिवाय पर्याय उरणार नाही. मात्र, पुन्हा बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च करण्याची आर्थिक क्षमता अनेक शेतकऱ्यांकडे उरलेली नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे.
दौंड तालुक्यालाही पावसाचा फटका
दौंड तालुक्यातील भीमा व मुळा मुठा नदीला पुर आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी या भागातील जिल्हा परिषद सदस्या डॉ.गायत्री खळदकर व पंचायत समितीच्या सदस्या मनिषा ताकवणे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस करत त्यांना दिलासा दिला.
दौंड तालुक्यातील पिंपळगाव,देलवडी, पारगाव, नानगाव,हातवळण,कानगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करीत अडचणी जाणून घेतल्या.गेली तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा व मुळा मुठा नदीला पूर आला असून नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे कृषीपंप पाण्याखाली गेले आहेत. उभी पिके, चारा, शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या डॉ. गायत्री खळदकर यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाने कोणताही विलंब न करता नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.