Drinking Water Pudhari
पुणे

Pune Drinking Water Quality: पुणे जिल्ह्यातील पाणी तपासणीत धक्कादायक निष्कर्ष; हवेली, शिरूरमधील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले

३ हजार ७७५ नमुन्यांची तपासणी; ९१ टक्के पाणी पिण्यास योग्य, मात्र ३३५ नमुने ठरले अयोग्य

पुढारी वृत्तसेवा

विनय पुराणिक

पुणे: जिल्ह्यातील पिण्याचे पाणी ९१.१३ टक्के योग्य आणि गुणवत्तापूर्ण असले, तरी हवेली, शिरूर या दोन तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्यामधील क्षार जिल्ह्यातील ११ तालुक्यांपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक बाब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) रासायनिक तपासणी अहवालात समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले असून, याबाबत जिल्हा प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना जीएसडीए विभागाने केल्या आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार, मान्सून पूर्व आणि उत्तरेत्तर मान्सून अशा दोन टप्प्यांत भूजल सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार मान्सून पूर्व प्रक्रियेतील १३ तालुक्यांतून जीएसडीएकडे सन २०२५-२६ या वर्षासाठी तीन हजार ७७५ पाण्यांचे नमुने प्राप्त झाले होते. सर्व पाण्यांचे नमुने प्रादेशिक उपसंचालक यांच्या अंतर्गत मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले. त्यापैकी ३४४० नमुने (९१.१३ टक्के) पिण्यासाठी योग्य, तर ३३५ नमुन्यांचे (८.८७ टक्के) पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. यामध्ये हवेली तालुक्यातून २०९ पाण्याच्या नमुन्यांपैकी ११७ आणि शिरूर तालुक्यातून २९८ पैकी ११५ नमुन्यांच्या पाण्यांमध्ये मापकांनुसार क्षार कमी-जास्त असल्याची नोंद तपासणी अहवालात नमूद केली आहे.

त्यापाठोपाठ बारामतीमध्ये ३६, पुरंदरमध्ये १९, भोर व मुळशीमध्ये प्रत्येकी १८ नमुने अयोग्य ठरले आहेत. दौंड आणि इंदापूरमध्ये प्रत्येकी दोन नमुने अयोग्य आढळले, तर जुन्नर, मावळ, खेड, आंबेगाव आणि वेल्हा तालुक्यांतील परिस्थिती उत्तम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हवेली आणि शिरूर या तालुक्यांतील परिस्थिती लक्षात घेता संबंधित विभागांनी दूषित जलस्रोतांचा शोध घेऊन तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याचे जीएसडीए विभागातील भू-वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले.

अयोग्य पाणी कसे?

जीएसडीएच्या १५ सुरक्षित मानकांनुसार उत्तम पाण्यासाठी पाण्यात विरघळलेले घन पदार्थांच्या (टीडीएस - टोटल डिसॉल्वड सॉलिड्स) पाण्यातील क्षार, खनिजे, धातू, सूक्ष्म घन पदार्थ यांचे मिलिग्रॅम प्रतिलिटर आणि पीपीएम (पार्ट पर मिलीयन) ही मापके लावण्यात आली. यामध्ये नैसर्गिकरीत्या भूजल, खडक आणि मातीतून वाहणाऱ्या पाण्यातील फ्लोराईड (फ्लोरीन) आणि न्यूट्रेट तपासणीनुसार पाण्यातील रासायनिक संयुगांची तपासणी करण्यात आली. अयोग्य पाणी असलेल्या तालुक्यांमधील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण २०० मिलिग्रॅम आणि न्यूट्रेटचे प्रमाण ४५ मिलिग्रॅमपेक्षा अधिक आहे. दीर्घकाळ पाण्याच्या वापरामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे मापदंडानुसार स्पष्ट होत असल्याचे जीएसडीएतील भू-वैज्ञानिक सांगतात.

पाणी खराब होण्याची कारणे

  • रासायनिक खतांचा बेसुमार वापर

  • सांडपाणी, मलनिस्सारण किंवा औद्योगिक प्रदूषण

  • भूजलसाठ्याचा बेसुमार उपसा

  • हवामान बदल

जिल्ह्यातील तालुकानिहाय परिस्थितीचा अहवाल

शिरूर: २९८: ११५

हवेली: २०९: ११७

मुळशी: १३५: १८

मावळ: १९१ ०

खेड: ५४६ ०

भोर: २१७: १८

वेल्हा: २३५: ३

बारामती: २७४: ३६

पुरंदर: २७८: १९

आंबेगाव: ४०१: ५

जुन्नर: ४८९: ०

इंदापूर: २७६: २

दौंड: २२६: २

एकूण: ३,७७५: ३३५

सुरक्षित मापदंडानुसार पुण्यातील पाणी पिण्यासाठी चांगले असून, केवळ हवेली आणि शिरूर तालुक्यातील पाण्यांच्या नमुन्यांमधील क्षार कमी-जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेला अहवाल पाठवून कार्यवाहीबाबत सूचना केल्या आहेत.
जयंत मिसाळ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जीएसडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT