Pune District Cooperative Bank Pudhari
पुणे

Pune District Bank Election: पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘ठरावां’चा भाव वाढला? ५० हजार ते १ लाखांपर्यंत चर्चेला उधाण

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-२७ ते २०३१-३२ संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विकास सोसायटी मतदारसंघात ठरावांसाठी रस्सीखेच वाढली.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी बँक) संचालक मंडळ निवडणूक सन 2026-27 ते 2031-32 करिता सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागवण्याचे कामकाज सुरू झाले आहे. विकास सोसायटी मतदार संघासाठी गावपातळीवरील राजकारण तापू लागले असून, ठरावात मतदानासाठी अंतिम नावातील मतदारासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

काही तालुक्यांत विकास सोसायटीचे संचालक ते ठराव मतदान करणाऱ्यांसाठी सरासरी पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंतच दर फुटल्याची जोरदार चर्चा असून, काही तालुक्यांमध्ये हा दर अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठराव द्यावयाच्या अंतिम दिवस असलेल्या 22 सप्टेंबरपर्यंत सोसायटी मतदारसंघात पैशाचा धूर कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 संचालक निवडून येतात. प्रारूप मतदार यादीच्या गोषवाऱ्यानुसार (सुधारित दि. 13 ऑगस्ट 2026 अखेर) एकूण सर्व प्रकारच्या पात्र सभासदांची संख्या 7 हजार 617 इतकी आहे. त्यामध्ये ‘अ’ वर्ग गटातून विकास सोसायट्यांची संख्या 1377 इतकी आहे.

‘अ’ वर्गातून प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 13 संचालक निवडून येतात. त्यासाठी विकास सोसायट्यांचे ठराव देण्यासाठी सध्या सोसायट्यांच्या संचालक मंडळाला बँकेसाठी इच्छुक उमेदवारांकडून मतदान ठरावासाठी आपल्या बाजूने गळ घालण्याचे काम सुरू झाले आहे.

त्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. प्रत्यक्षात ठरावानुसार मतदानाचे नाव निश्चित झालेले अध्यक्ष अथवा संचालकांचा भाव प्रत्यक्ष मतदानावेळी

आणखी निर्णायक राहत असल्याने तो वधारण्याचीच चर्चा रंगली आहे. ‘ब’ वर्गातील एकूण पात्र संस्थांची संख्या 161, ‘क’ वर्गातील एकूण पात्र संस्थांची संख्या 1711 आणि ‘ड’ वर्गातील एकूण पात्र संस्थांची संख्या 4 हजार 368 असून सद्यःस्थितीत संस्था सभासदसंख्या 7 हजार 617 आणि व्यक्ती सभासद 1 हजार 679 मिळून एकूण सभासद 9 हजार 296 असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सभासद संस्थेचे ठराव हे दिनांक 24 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2026 पर्यंत संबंधित तालुका उप/सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत चार प्रतींमध्ये दाखल करावयाचे असल्याची जाहीर सूचनाही जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपची व्यूहरचना महत्त्वाची ठरणार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे एकहाती वर्चस्व आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या या बँकेच्या निवडणुकीत या पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची राहणार आहे.

सुमारे 31 हजार कोटींहून अधिक उलाढाल असणारी ही बँक शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याची आर्थिक नाडी असणारी महत्त्वाची सहकारी संस्था आहे. त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आगामी काळात कोणती व्यूहरचना आखणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाल्यानंतर पक्षीय पातळीवर त्याला वेग येण्याची अपेक्षा सूत्रांकडून वर्तविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT