kidnapping cases Pudhari
पुणे

Pune Kidnapping Case: पुणे जिल्हा बँक निवडणुकीच्या नावाखाली महिलेचे अपहरण

माजी सभापतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर : पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी निवडीत बहुमत सिद्ध करण्याच्या कारणावरून खेड तालुक्यातील आंबोली येथील ४७ वर्षीय महिलेचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात माजी पंचायत समिती सभापतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण धोंडू शिंदे आणि मंगल लक्ष्मण शिंदे (सर्व रा. आंबोली, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पुष्पा दत्तात्रय शिंदे (वय ४७) यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा अतुल दत्तात्रय शिंदे (वय २७) यांनी खेड पोलिसांकडे दिली आहे. सुरेश शिंदे हे खेड पंचायत समितीचे माजी सभापती आहेत.

तक्रारीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरेश शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि मंगल शिंदे हे आंबोली येथील अतुल शिंदे यांच्या घरी आले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पुष्पा शिंदे यांना खेड येथे घेऊन जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तिघांनी पुष्पा शिंदे यांना हुंडाई क्रेटा (एमएच १४ एचके ६६०६) या वाहनातून सोबत नेले.

मात्र, त्या सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यामुळे अतुल शिंदे यांनी संबंधितांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे मोबाइल बंद असल्याचे आढळले. यानंतर स्थानिक पातळीवर चौकशी केली असता आरोपींच्या कुटुंबीयांनी ‘ते घरी येतील, काळजी करू नका,’ असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तीन दिवस प्रतीक्षा करूनही पुष्पा शिंदे घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावल्याने अतुल शिंदे यांनी मंगळवारी (दि. ८) रात्री उशिरा खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले

खेड तालुक्यातील १०४ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदार प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवडीसाठी २२ सप्टेंबरपर्यंत ठराव संमत केले जाणार आहेत. मतदार प्रतिनिधी निवडीवरून गावोगावी राजकीय हालचाली वाढल्या असून, तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर महिलेच्या कथित अपहरणाची घटना समोर आल्याने खेड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT