धानोरी : कळस, धानोरी व लोहगावमधील नागरी प्रश्नांसंदर्भात वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे धनंजय जाधव व पूजा जाधव यांनी धानोरी मुख्य रस्त्यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या वाहनासमोर लोटांगण घेत अभिनव पद्धतीने महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. दिवसभर समाजमाध्यमांमध्ये या आंदोलनाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला होता. (Latest Pune News)
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम काही कामानिमित्त बुधवारी (दि.16) सकाळी धानोरीत आले होते. तेथील काम आटोपून लोहगावमार्गे वाघोलीकडे जात असताना धानोरी मुख्य रस्त्यावर आयुक्तांच्या वाहनासमोर धनंजय जाधव व पूजा जाधव यांनी लोटांगण घेतले. या वेळी ‘जागे व्हा, जागे व्हा, पालिका प्रशासन जागे व्हा’, ‘झोपलेल्या पालिका प्रशासनाचा निषेध असो’, अशा घोषणा जाधव दाम्पत्य व उपस्थित कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. मात्र, आयुक्तांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने पुढे होत जाधव दाम्पत्याला बाजूला केले. अचानक झालेल्या या प्रसंगाने वैतागलेल्या आयुक्तांनी ‘तुम्हाला इथे कुणी पाठवले’, असा सवाल जाधव यांना केला. या वेळी आम्ही स्वतःच इथे आलो आहोत, असे म्हणत धनंजय जाधव यांनी आयुक्तांपुढे कळस, धानोरी व लोहगाव परिसरातील समस्यांचा पाढा वाचला.
लोहगावमधील साठेवस्ती, निंबाळकरनगर, मोझेनगर, पोरवाल रस्ता परिसरातून दोन दिवसाआड पाणी येते. डी. वाय. पाटील विद्यापीठ ते लोहगाव रस्ता अनेक महिन्यांपासून रखडला आहे. या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्याचे धनंजय जाधव यांनी सांगितले.
धनंजय जाधव यांनी सहा महिन्यांपूर्वी काही समस्यांबाबत प्रशासनाकडे निवेदने दिली होती. आयुक्तांनी त्यांना कार्यालयात भेटायला बोलावले आहे. जाधव यांच्या मागण्यांची चौकशी करून क्षेत्रीय कार्यालयाकडून होणारी कामे करण्यात येतील.- राजेश गुर्रम, सहाय्यक आयुक्त, पुणे महापालिका