पुणे: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम असून, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत १,६४३ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती उपलब्ध आकडेवारीतून समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ६६२ रुग्ण आढळल्याने महापालिकेने वाॅर्डनिहाय चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांतही रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये १०३, जुलैमध्ये ३६६, ऑगस्टमध्ये ५१२, तर सप्टेंबरमध्ये ६६२ रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये ३ लाख ९८ हजार पाण्याची भांडी व कंटेनर तपासण्यात आले.
त्यापैकी ३,३४८ ठिकाणी डासोत्पत्तीस पोषक परिस्थिती आढळली. संबंधितांना ४०२ नोटिसा बजाविण्यात आल्या असून, १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर रुबी हॉल रुग्णालयातही सप्टेंबर महिन्यापासून आत्तापर्यंत १३९ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी ९३ रुग्णांच्या एनएस १ अँटिजेन आणि आयजीएम अँटिबॉडी या दोन्ही चाचण्या सकारात्मक आल्या, तर ४६ रुग्णांच्या चाचणीत केवळ आयजीएम अँटिबॉडी आढळली.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये रक्तस्राव, रक्तवाहिन्यांमधून द्रवगळती आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होण्यासारख्या गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे केवळ प्लेटलेट्सच्या संख्येवरून आजाराची तीव्रता ठरवू नये, असे रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय तज्ज्ञ व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी स्पष्ट केले. तर सतत ताप, पोटात तीव्र वेदना, वारंवार उलट्या, रक्तस्राव किंवा असामान्य गुंगी जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
घराच्या परिसरात, गच्चीवर, कुंड्यांमध्ये, टाक्यांमध्ये तसेच टाकून दिलेल्या वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये. पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत, टाक्या झाकून ठेवाव्यात आणि डासांपासून संरक्षणासाठी योग्य उपाय करावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांसोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही महत्त्वाचा आहे.डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका