वेल्हे : पावसाने विश्रांती घेतल्याने धरणसाठ्यात गेल्या 24 तासांत 0.07 टीएमसी इतकी अल्पशी भर पडली. मंगळवारी (दि. 5) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 29.95 टीएमसी म्हणजे 89.01 टक्के पाणीसाठा झाला होता. सोमवारी (दि. 4) सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 25.88 टीएमसी पाणी होते. (Pune Latest News)
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावरील तुरळक पावसाचा अपवाद वगळता चारही धरणक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पावसाची नोंद झाली नाही. गेल्या सहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने ओढे- नाले, नद्यांचे प्रवाह मंदावले आहेत. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक अल्प प्रमाणात होत आहे.
वरसगाव व पानशेतमधून प्रत्येतकी 600, टेमघरमधून 300 असे दीड हजार क्युसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासलाची पातळी 67 टक्क्यांहून अधिक झाली आहे.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, खडकवासला धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने पाण्याची आवक अल्प होत आहे.