पुणे: ढोल-ताशांचा गजर, सेलिब्रिटींची उपस्थिती, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची मेहनत अन् सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल... अशा वातावरणात शनिवारी (दि.५) शहर अन् उपनगरांत ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव रंगणार आहेत. शहर आणि उपनगरांतील वातावरण गोविंदामय झाले असून, यंदा विक्रमी थर रचण्यासह सुरक्षिततेला प्राधान्य देत उत्सव साजरा करण्याची तयारी पथकांनी केली आहे.
मंडळांचीही तयारी पूर्ण झाली असून, उत्सवाच्या निमित्ताने शहर आणि उपनगरांत जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, सांगीतिक कार्यक्रम, विद्युत रोषणाई अन् गीतांवर थिरकणारी तरुणाई असे वातावरण शहर आणि उपनगरांत पाहायला मिळणार आहे. पेठांमधील पारंपरिक आणि मानाच्या दहीहंडी उत्सवांसह विविध मंडळे, राजकीय पक्षांतील नेत्यांनीही उत्सवाचे आयोजन केले आहे.
उत्सवात सेलिब्रिटींची अन् इन्फ्लुएन्सर्सची उपस्थिती
ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार आणि त्यात लोकप्रिय कलाकारांची मंचावर होणारी एंट्री... यंदाच्या दहीहंडी उत्सवाची रंगत काहीशी 'सेलिब्रिटीमय' होणार आहे. उत्सवासाठी मंडळांनी मंचाची आकर्षक सजावटही केली आहे.
क्रेनला लावलेली हंडी, रंगबिरंगी फुले, फुगे, विद्युत रोषणाई आणि कापडांच्या वापराने केलेली सजावट लक्षवेधी ठरत आहे. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करणार असल्याने आयोजकांकडूनही खास तयारी करण्यात आली आहे. व्यासपीठ, पथकांच्या स्वागताची व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन यावर भर दिला जात आहे.