Dj Sound Reading Pudhari
पुणे

Pune Dahi Handi Noise Pollution: पुण्यात दहीहंडीचा डीजेचा दणदणाट कमी; १,१०० मंडळांचे ‘साउंड रीडिंग’, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा; ५९ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन, ३३ ठिकाणी १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: डीजेला असलेला पुणेकरांचा तीव्र विरोध, पोलिसांनी घालून दिलेली 'चार बेस, चार टॉप'ची मर्यादा आणि काही मंडळांनी स्वतःहून डीजेमुक्त दहीहंडी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे यंदा शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडीतील डीजेचा दणदणाट तुलनेने कमी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, उपनगरांसह शहराच्या इतर भागांमध्ये 'चार बेस, चार टॉप'ची मर्यादा असतानाही ध्वनिप्रदूषणाच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचे दिसून आले.

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल १ हजार १०० मंडळांच्या ध्वनीचे 'रीडिंग' घेतले आहे. या वेळी ध्वनीची तीव्रता किती होती, याची नोंद केली आहे. या नोंदींचे परीक्षण करून निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील डीजेचा मुद्दा वादग्रस्त ठरला असून, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य पुणेकरांनी डीजेला विरोध दर्शवला आहे.

रविवारी यासंदर्भात मोठा मोर्चाही काढण्यात आला. त्यामुळे दहीहंडी उत्सव हा गणेशोत्सवापूर्वीची 'रंगीत तालीम' मानली जात होती. पोलिसांनी दहीहंडीपूर्वीच डीजे आणि ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार चार बेस आणि चार टॉपची मर्यादा घालण्यात आली होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक मंडळांनी नियमांचे पालन केले, तर काहींनी डीजेमुक्त दहीहंडी साजरी केली. मात्र, उपनगरांतील काही भागांत चार बेस, चार टॉपची संख्या मर्यादित असली, तरी आवाज कर्णकर्कश पातळीवर पोहोचल्याचे दिसून आले. काही मंडळांकडून अधिक क्षमतेची ध्वनिव्यवस्था लावल्यानंतर पोलिसांनी ती तत्काळ जप्त केली.

'रीडिंग'च्या अहवालावर कारवाई

१,१०० मंडळांच्या ध्वनीच्या 'रीडिंग'चे परीक्षण करून नियमभंग करणाऱ्या मंडळांची छाननी केली जाणार आहे. दरम्यान, बिबवेवाडी परिसरात ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी एका मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार बेस, चार टॉपची मर्यादा पाळली तरी निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक आवाज केल्यास कारवाई होणार असल्याने संबंधित मंडळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

३३ ठिकाणी १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज

डीजेविरोधी पुणेकर मंचाच्या वतीने शहरातील विविध भागांत ध्वनीप्रदूषणाची नोंद घेण्यात आली असून, आतापर्यंत ५९ ठिकाणी ध्वनिपातळीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा मंचाने केला आहे. यापैकी तब्बल ३३ ठिकाणी ध्वनीची तीव्रता १०० डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे मंचाने म्हटले आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी ध्वनीची पातळी आणि संबंधित ठिकाणाची नोंद करून हा डेटा संकलित केला आहे. शहरातील विविध भागांतून ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे ध्वनिप्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत मंचाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT