पुणे: बालपणापासून मुलांना खेळाचे ज्ञान मिळावे, या हेतूने राज्यात विशेष क्रीडा शाळा सुरू करणार असून, यातून निश्चितच राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना पदके मिळतील, अशी आशा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.
68 व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शिक्षणमंत्री दादा भुसे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, आयोजक रामकृष्ण सातव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, कुस्ती पंच प्रमुख दिनेश गुंड उपस्थित होते.
भरणे म्हणाले, खूप मोठे मैदान तयार केले आहे. याच मैदानातून एक खेळाडू ऑलिम्पिकपटू होतील. कुस्तीपटूंना येणाऱ्या अडचणीत सरकार पाठीशी असून, सर्वतोपरी मदत करू भविष्यात नक्कीच महाराष्ट्रतील खेळाडू उत्तम कामगिरी करतील.
सातव म्हणाले, केवळ 37 दिवसात ही स्पर्धा भरविण्याचे शिवधनुष्य केवळ वाघोली ग््राामस्थांमुळे उचलू शकलो. या स्पर्धेतील विजेत्या मल्लांना भरघोस पारितोषिक देण्याचा आमचा मानस पूर्ण झाला. कुस्तीची ग््राामीण भागातील चौकट मोडून शहरात आली पाहिजे. त्यातून कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर कुस्तीला राजाश्रय देण्यासाठी पुढे यावेत हा हेतू कुस्ती भरवण्यामागचा आहे.
मंगलदास बांदल यांच्या भाषणावेळी गोंधळ
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वेळी उपस्थित पाहुण्यांमध्ये मंगलदास बांदल यांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थित कुस्ती शौकिनानी आरडाओरडा सुरू केला. भाषण बंद करून स्पर्धा सुरू करावी, अशी मागणी उपस्थितांकडून झाली. त्यामुळे बांदल यांना आपले भाषण थांबवावे लागले.