Pune Customs Dog Pudhari
पुणे

Pune Customs Dog: पाच बहिणी, पाच विमानतळ अन् एकच मिशन; ‘ओवी’ने शोधला एक कोटींचा हायड्रोपोनिक गांजा!

अटारी-वाघा सीमेवर नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण; पुणे कस्टमच्या ‘ओवी’सह पाच लॅब्राडोर बहिणी तस्करीविरोधात देशसेवेत

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र कांबळे

पुणे: विमानतळावर हजारो प्रवाशांची गर्दी... असंख्य ट्रॉलीबॅगा... प्रत्येक बॅगेत वेगवेगळे सामान... या गर्दीत एखाद्या बॅगेत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ, सोने किंवा तस्करीचे अन्य साहित्य लपवले आहे का? याचा माग काढण्याची जबाबदारी 'ओवी'सह पाच सख्ख्या बहिणींवर आहे. माणसाच्या कल्पनेपलिकडील तीक्ष्ण घ्राणेंद्रिय आणि कठोर प्रशिक्षणाच्या जोरावर ओवी, ऊर्मी, ओरो, ओपल आणि वरयू या पाच लॅब्राडोर जातीच्या श्वानांनी देशाच्या वेगवेगळ्या विमानतळांवर 'के-९' पथकाचा महत्त्वाचा भाग म्हणून आपली सेवा सुरू ठेवली आहे. एकमेकींपासून दूर असल्या, तरी देशसेवेचे ध्येय एकच... म्हणूनच या पाच 'बहिणी' केवळ कस्टमच्या पथकाचा भाग नाहीत, तर देशाच्या सुरक्षेच्या पहारेकरी ठरत आहेत.

नुकताच बँकॉकहून पुण्यात आणलेला एक कोटी रुपये किमतीचा हायड्रोपॉनिक गांजा ओवीने शोधून काढला. ट्रॉलीबॅगेत खास गुप्त कप्पा तयार करून त्यात व्हॅक्यूम सील केलेली काळ्या रंगाची पाकिटे ठेवण्यात आली होती. मात्र, तपासणीदरम्यान ओवीने बॅगचा वास घेताच ती सतर्क झाली. तिने आपल्या हँडलरला ठरावीक संकेत दिला. त्यानंतर बॅगची तपासणी केली असता गुप्त कप्प्यात लपवलेला तीन किलो २८ ग्रॅम हायड्रोपॉनिक गांजा आढळून आला.

९ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण

या पाचही बहिणींना एकाच वेळी सेवेत दाखल करण्यात आले. पंजाबमधील अमृतसरजवळ अटारी-वाघा सीमेवरील कस्टम विभागाच्या विशेष श्वान प्रशिक्षण केंद्रात त्यांना नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण देण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी शांत राहणे, हँडलरचे आदेश समजून घेणे, संशयास्पद गंध ओळखणे आणि गंध मिळाल्यानंतर योग्य संकेत देणे, याचा त्यांना सराव करून घेण्यात आला आहे. विशेषत: अमली पदार्थांची तस्करी, सोने तस्करी तसेच अन्य संशयास्पद वस्तूंची वाहतूक शोधण्यासाठी त्यांच्या विशेष कौशल्‍याचा वापर केला जातो. तस्करांकडून लपवण्यात येणाऱ्या वस्तूंचा गंध ओळखणे, हे या प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तस्करीच्या प्रकारानुसार संशयित साहित्याचा माग काढणे, त्यावर हँडलरचे लक्ष वेधणे आणि गर्दीत विचलित न होता काम करणे, यासाठी त्यांना विशेष सराव दिला जातो. वन्यजीवांची कातडी किंवा अन्य वन्यजीवजन्य तस्करीचे साहित्य शोधण्याच्या कारवाईतही प्रशिक्षित श्वान पथकाची भूमिका महत्त्वाची ठरते.

पाच बहिणी, पाच कस्‍टम विभाग

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पाचही बहिणींची देशातील वेगवेगळ्या विमानतळांवर नियुक्ती करण्यात आली. ओवी पुणे विमानतळावर; तर ऊर्मी, ओरो, ओपल आणि वरयू या देशातील विविध कस्‍टम विभागांत कार्यरत आहेत. कोची, विशाखापट्टणम, कोलकाता आणि हैदराबाद अशा कस्‍टम विभागांतर्गत येणाऱ्या विमानतळाबरोबर त्‍या कस्‍टम विभागाच्‍या परिसरात या चौघी कर्तव्य बजावत आहे. प्रशिक्षित श्वानांच्या वास घेण्याच्‍या कौशल्‍यापासून ही लपवाछपवी सहज सुटत नाही. माणसांना दिसत नाही ते गंधाने ओळखणे आणि तस्करीचा माग काढणे, हीच त्यांची ताकद आहे. पाचही जणींचा जन्‍म अटारी बॉर्डरवर झाला आहे.

गांजा तस्करीच्या कारवायांमध्ये ओवीची महत्त्वाची भूमिका

ओवीचा जन्‍म डिसेंबर २०२० मध्ये झाला. २०२२ मध्ये पुणे कस्‍टम विभागातून सॅम नावाच्‍या श्वानाची निवृत्ती झाली. २०२५ मध्ये ओवीला पुण्यातील कस्‍टम विभागातील डॉग हँडलर सुनील कांबळे यांच्‍यासोबत विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. त्‍यानंतर तिला पुण्यात आणले. कस्‍टम विभागाचे आयुक्‍त अनिल डी. उपायुक्‍त धीरज मोरे यांच्‍या मार्गदर्शनात कस्‍टम विभागाने आत्तापर्यंत मोठ्या कारवाया केल्‍या आहेत. यात ३० कोटींहून अधिक किमतीचा ८६ किलो हायड्रोपोनिक गांजा व इतर तस्‍करीविरोधात कारवाया केल्‍या आहेत. त्‍या बहुतांश कारवायांमध्ये ओवीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT