Pune Crime
पुणे: शहराला हादरवून सोडणारी आणि माणुसकीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना टिंगरेनगर परिसरात उघडकीस आली आहे. एका तरुणाने भटक्या श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होनाप्पा अमोघीसिद्ध होस्मानी (रा. विश्रांतीवाडी) असे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेने प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितींनुसार, फिर्यादी तरुणी ही टिंगरेनगर येथे राहण्यास आहे. 3 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी तरूणीच्या घराच्या समोर ही घटना घडली. तरुणीच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये, सार्वजनिक रस्त्यावर, गल्लीमध्ये आरोपीने एका फिरस्त्या श्वानाला वारंवार मारहाण केली. तसेच त्या श्वानावर अत्याचार करून छळ केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
तिच्या तक्रारीनंतर विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपीने तेथून पळ काढला होता. पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेत आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियमांतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. विमानतळ पोलीस सध्या आरोपी होनाप्पा होस्मानी याचा शोध घेत असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्राण्यांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्यावरील अत्याचारांना प्रतिबंध घालणाऱ्या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.