राजगुरुनगर : तिन्हेवाडी (ता. खेड) येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलाच्या आवारातील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी फोडून, त्यामधील तांब्याची केबल चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. २१) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे क्रीडा संकुल परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वापरण्यात आलेले मतदान साहित्य क्रीडा संकुलात ठेवण्यात आले असल्याने, येथे दोन पोलीस कर्मचारी रात्रपाळीसाठी तैनात होते. क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ट्रान्सफॉर्मरचे अंतर अवघे २०० फूट असून परिसरात विजेच्या दिव्यांची पुरेशी सोयही होती. तरीही चोरट्यांनी धाडस करत ट्रान्सफॉर्मर फोडला आणि त्यातील तांब्याची केबल लंपास केली. या प्रकारामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ट्रान्सफॉर्मर खाली कोसळताना झालेला मोठा आवाज कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कसा ऐकू आला नाही? चोरीदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही कोणी तातडीने दखल का घेतली नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. पोलिसांच्या उपस्थितीतच ही चोरी झाल्याने नागरिकांमधून तीव्र आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, खेड तालुक्यात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चोरटे ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेत असल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत होतो. सध्या शेतीपंप, पाणीपुरवठा योजना आणि सार्वजनिक ठिकाणांवरील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. पोलिसांत अनेक तक्रारी करूनही चोऱ्यांचा छडा लागत नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
"मतदान साहित्य सुरक्षेसाठी क्रीडा संकुलात रात्री दोन पोलीस कर्मचारी तैनात असतात. परिसरातील ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याची माहिती मिळाली असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल."— सुभाष चव्हाण, पोलीस निरीक्षक