नारायणगाव : नारायणगाव येथील विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या तमाशाच्या कलावंताना माळेगाव पठार येथे तमाशा कार्यक्रमासाठी निघाले असता रस्त्यात गाड्या अडवून लाथा-बुक्क्या व काठीने बेदम मारहाण करण्यात आली. महिला कलावंताचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिली.
या प्रकरणी फड मालक कैलास मारुती सावंत (वय ५९, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमित शांताराम गुंजाळ, संकेत शांताराम बांगर, सोमेश सुखदेव बोंबले, दत्तात्रय रावसाहेब पडवळ (सर्व रा. वरुडी पठार, ता. संगमनेर) यांना अटक करण्यात आली आहे.
विठाबाई नारायणगावकर या तमाशाचा कार्यक्रम १ एप्रिल रोजी माळेगाव पठार (ता. संगमनेर) येथे होता. या कार्यक्रमासाठी फडातील १६ महिला, ४४ पुरुष कलावंत व कामगार बस व ट्रकमधून निघाले होते. दरम्यान दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील वरुडी पठार येथे आमच्या गाडीला कट का मारला? या कारणावरून आरोपींनी तमाशाची चार वाहने अडवली. आरोपींनी चालक प्रकाश औटी, विकास जठार यांना काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बसमधील महिला कलावंत अक्षरा शामिल शिंदे, आरुषी सुमित काळे, संध्या राम चौघुले, शामिल अतुल शिंदे यांच्यासह गणेश शिवाजी गायकवाड, राम बशीरुध्दीन चौगुले, अजित वाळुंज यांना काठी व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. महिलांशी अश्लील वर्तन करून त्यांचे कपडे फाडले. महिला कलावंतांच्या पोटात व छातीवर लाथा मारून लज्जा होईल, असे वर्तन केले. यामध्ये तीन कलावंत गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कैलास सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे अंमलदार एकनाथ खाडे तपास करत आहेत.
दरम्यान नारायणगाव ही तमाशाची पंढरी असून या तमाशा पंढरीची ओळख या कलावंतांमुळे महाराष्ट्रभर झाली आहे. यात्रांच्या निमित्ताने तमाशाच्या कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचे काम करणाऱ्या कलाकारांना अशी मारण होणं उचित नाही. या घटनेचा निषेध असून मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरज वाजगे यांनी केली आहे.