पुणे : मित्राबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने महिलेवर चाकूने वार करून तिचा खून केला. ही घटना अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय १९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली. याबाबत शाहरुख दस्तगीर पठाण (वय २३, रा. बालाजी सोसायटी, शिरसवडी, वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख पठाण आणि नम्रता व्हटकर दोन-तीन महिन्यांपासून एकत्र राहताहेत. नम्रता आणि पठाण हे नगर रस्त्यावरील एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथे दोघांची ओळख झाली. दोन वर्षांपूर्वी नम्रताचा शैलेंद्र व्हटकरशी विवाह झाला होता. नम्रता आणि पठाण यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय शैलेंद्रला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. काही महिन्यांपूर्वी नम्रता शैलेंद्रशी भांडण करून पठाणकडे राहण्यास आली होती.
विवाहात दिलेले नम्रताचे सोन्याचे दागिने शैलेंद्रकडे होते. तिने त्याच्याकडे दागिने परत करण्याची मागणी केली होती. गुरुवारी (२२ जानेवारी) पठाण कामानिमित्त शिरूर येथे गेला होता. रात्री ८ वाजता घरी परतला, तेव्हा शैलेंद्रला दागिने परत करण्यास सांगितले आहे, असे तिने पठाणला सांगितले. त्यानंतर शैलेंद्रच्या मोबाइलवर त्यांनी संपर्क साधला.
नम्रता आणि पठाण यांना शैलेंद्रने नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलावले. त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते. पठाणचा मित्र हरीश कोळपे हा देखील तेथे आला होता. शैलेंद्रने नम्रताला फोन करून जोगेश्वरी हायस्कूलजवळ बोलावले. नम्रता पठाणची दुचाकी घेऊन तेथे गेली. दोघांमध्ये तेथे वाद झाले. वादातून शैलेंद्रने नम्रतावर चाकूने वार केले.
नम्रताचा ओरडण्याचा आवाज पठाणने ऐकला. पठाण आणि त्याच्या मित्राने नम्रताला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या शैलेंद्रला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक खेडकर तपास करत आहेत.