पुणे : रविवार पेठेत घरफोडी करून तब्बल २ कोटी २० लाख रुपये किमतीचे २ किलो २०० ग्रॅम सोने चोरणाऱ्या काका-पुतण्याला खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. मुस्तफा नजीर शेख (वय ३६) आणि सरफराज ऊर्फ आवेज मैनूद्दीन शेख (वय २२, दोघे रा. काच आळी, रविवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या सोन्यासह अतिरिक्त ४६ ग्रॅम असे एकूण २ किलो २४६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
फिर्यादी मोहम्मद तौफीक रज्जाक खान (वय ३६) हे सोन्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करतात. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते सव्वाआठच्या दरम्यान ते कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटात ठेवलेले २ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे असा २ कोटी २० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोलिस हवालदार हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयूर भोसले आणि सैफ नदाफ यांना फिर्यादी राहत असलेल्या इमारतीखाली दोन संशयित घुटमळताना दिसले. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पडताळणी केली असता, हे दोघेही त्याच इमारतीत राहत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी संशयावरून मुस्तफा शेख आणि सरफराज शेख यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता, त्यांनी घरफोडीची कबुली दिली. चौकशीदरम्यान हे दोघे नात्याने काका-पुतणे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला, तसेच त्यांच्याकडून आणखी ४६ ग्रॅम अतिरिक्त सोनेही जप्त केले.
पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार, राहुल मखरे, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, निलेश साबळे, विकास पांडोळे, सैफ नदाफ व उमेश मठपती यांच्या पथकाने ही धडक कामगिरी केली.