एटीएम लुटणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांकडून सिनेस्टाईल पाठलाग; मुद्देमाल टाकून चोरटे पसार Pudhari
पुणे

एटीएम लुटणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांकडून सिनेस्टाईल पाठलाग; मुद्देमाल टाकून चोरटे पसार

रोकड, मोटार सोडून चोरटे पसार; चाकण एमआयडीसीतील बिरदवडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Pune Crime News: गॅसकटरने एटीएम तोडून मोठी रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) मध्यरात्री 1 वाजता चाकण एमआयडीसी भागात बिरदवडी फाटा (ता. खेड) येथे घडली. या घटनेत चोरी करताना गॅसकटरमुळे एटीएम मशिन जळाले.

एटीएम सेंटरमधून जाळ व धूर येत असल्याने परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तत्काळ महाळुंगे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. महाळुंगे पोलिसांच्या पथकाने अक्षरशः सिनेस्टाईल 8 ते 10 किलोमीटर चोरट्यांचा पाठलाग करून चोरट्यांना गाठले. (Latest Pune News)

मात्र, चोरट्यांनी चोरीची रक्कम आणि मोटारगाडी जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाकण-आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी फाटा येथे हिताची सर्व्हिसेसमार्फत एटीएम सेंटर सुरू करण्यात आले आहे.

या एटीएम सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळीने गॅसकटरने एटीएम मशिनचा दरवाजा कट केला. त्यानंतर एटीएममधील मोठी रोकड काढून घेतली. या आगीत एटीएम मशिन पेटले. त्यानंतर परिसरातील एका नागरिकाने महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

गस्तीवर असलेले पोलीस जवान अमोल माटे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. हिताची कंपनीचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आलेे. त्यानंतर पोलीस हवालदार प्रकाश चापळे, पोलीस नाईक काळे, पोलीस जवान अमोल माटे, शिवाजी लोखंडे, गणेश गायकवाड, अशोक गभाले आदींनी येथून बाहेर पडण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी केली.

अमोल माटे व त्यांच्या सहकार्‍यांना वाकी बाजूकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला वीटभट्टीच्या बाजूला एक काळी गाडी थांबल्याचे दिसले. पोलिसांनी ही गाडी अडविण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव असलेल्या चोरट्यांनी पोलीस वाहनाला धडक देऊन चाकणकडे पलायन केले.

पाठलाग करणार्‍या पोलिसांनी (Police) चाकण-आंबेठाण रस्त्यावर 2 ठिकाणी कंटेनर आडवे लावून रस्ते बंद केले. रस्ता बंद केल्याने चोरटे पुन्हा माघारी फिरले. पोलीस मागावर असल्याने व रस्ते बंद असल्याने चोरट्यांनी झित्राईमळा भागात ही एका गल्लीत गाडी नेली.

पोलीस हवालदार बिराजदार व अमोल माटे यांनी याच गल्लीत पोलीस वाहन आणून उभे केले. गाडी काढता येणार नाही, याची खात्री झाल्यानंतर चोरट्यांनी गाडी सोडून पोबारा केला. गाडीमध्ये 5 ते 6 चोरटे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

चाकण (Chakan) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना असल्याने चोरट्यांचे वाहन आणि त्यातील रोकड चाकण पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. महाळुंगे पोलिसांच्या पथकाने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चाकण पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT