पुणे: अनैतिक संबंधातून पुणे महापालिकेतील एका कंत्राटी कर्मचारी तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात घडली होती. त्या तरुणाचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतले. राहुल दशरथ जाधव (वय 30) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तीन ते चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जाधव याचा भाऊ केतन (वय 27) याने याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहुल पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याचे एका आरोपीच्या आईशी प्रेमसंबंध जुळले होते. महिलेचे राहुल याच्याशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण महिलेच्या मुलाला लागली होती. आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्रांनी संगनमत करून राहुलचा खून करण्याचा कट रचला.
कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील सागर कॉलनीकडे जाणार्या रस्त्यावर दुचाकीवर राहुल गुरुवारी (30 जानेवारी) सायंकाळी थांबला होता. त्या वेळी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. या गंभीर जखमी झालेल्या राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या राहुल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे तपास करत आहेत.