पुणे

Pune Crime News : शाळकरी मुलावर चाकूने वार

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रामोशी गेट परिसरात शाळकरी मुलांनी एकावर चाकूने वार केले. गज, पट्ट्याने त्याला बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला. या घटनेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, खडक पोलिसांनी चार शाळकरी मुलांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत दहावीत आहे. गुन्हा दाखल केलेली चार अल्पवयीन मुले याच परिसरातील महापालिकेच्या उर्दू शाळेत दहावीत शिक्षण घेत आहेत. मुलांची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. तक्रारदार अल्पवयीन मुलाची एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून एका मुलाशी दोन दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलाने या घटनेची माहिती शाळेतील मित्रांना दिली.

मंगळवारी (30 जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास शाळकरी मुलगा रामोशी गेट परिसरातून निघाला होता. त्यावेळी चौघांनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ केली. 'तुझे बहुत मस्ती आयी हैं. दादागिरी करता है क्या ?' अशी विचारणा करून मुलावर चाकूने खुनी हल्ला चढविला. शाळकरी मुलाच्या छातीवर चाकूने वार केले. गज, साखळी, चामडी पट्ट्याने त्याला भररस्त्यात मारहाण केली. नागरिकांनी हल्ला करणार्‍या मुलांना रोखले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामोशी गेट पोलिस चौकीतील उपनिरीक्षक अश्विनी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. जखमी झालेल्या शाळकरी मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT