Pune Crime News Pudhari
पुणे

Pune Crime : अपघाताचा बनाव; मात्र एका कॉलने खुनाला वाचा फुटली

तरुणाच्या खून प्रकरणात चार सख्ख्या भावांना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कबूतर चोरीच्या संशयातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला पाठलाग करून लाकडी बॅट, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला कबुतराच्या ढाबळीला बांधून ठेवले. सकाळी 6 वाजता त्याला उलट्या झाल्या आणि तो निपचित पडला. त्यावेळी मारहाण करणाऱ्यांनी त्याला अपघाताचा बनाव रचून ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, पोलिसांच्या कानावर ही माहिती आली आणि खुनाचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

वानवडी परिसरात बुधवारी (दि. 18) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गौरव माजी, सचिन माजी, मोनू माजी आणि बंटी माजी या चौघा सख्ख्या भावंडांना अटक केली आहे. रूपेश धनराज शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील धनराज शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

नेमके काय घडले?

रूपेश शिंदे आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हेे बुधवारी दुचाकीवरून मोशीच्या दिशेने जात होते. त्यावेळी ते कॅनॉललगत कबुतरे ठेवण्याचे बॉक्स ठेवलेल्या ठिकाणी थांबले असता अचानक कुत्र्यांनी जोरात भुंकायला सुरुवात केली. कुत्र्यांच्या आवाजाने कुणीतरी शिरल्याचा संशय निर्माण झाला आणि तेथील काही रहिवाशांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दुसरीकडे भीतीपोटी रूपेश आणि अजय तिथून सैरावैरा पळू लागले. पळताना रूपेशचा पाय घसरला आणि तो खाली पडला आणि या टोळक्याच्या ताब्यात सापडला.

...असे फुटले खुनाचे बिंग

खंडणी विरोधी पथकाचे हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या खबऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली, तेव्हा दोघे संशयित त्यांच्या हाती लागले. तोपर्यंत रुग्णवाहिकेतून आणलेला तरुण मयत झाला होता. चौकशीत दोघांनी सांगितले, आमची कबुतराची ढाबळ आहे. खून झालेला तरुण रूपेश हा कबुतरे चोरी करण्यासाठी आला असावा, असा संशय आम्हाला आला. त्यातूनच त्याला आम्ही पाचजणांनी बेदम मारहाण केली. आम्ही सुरुवातीला त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याला डॉक्टरांनी ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. अपघाताचा बनाव रचण्याची आम्ही तयारी करीत होतो. तथापि, ससूनमध्ये घेऊन येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT