पुणे

Pune Crime News : दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरातील एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले. भोसले व्हिलेज सोसायटीच्या कमानीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत ही टोळी दबा धरून बसली असताना पोलिसांनी ही कारवाई केली. टोळीतील अमन संजय दिवेकर (वय 22), विशाल संजय लोखंडे (वय 24, रा. दोघे कांबळे वस्ती, अपर इंदिरानगर) या दोघांना अटक करण्यात आली असून, विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, तर त्यांचे इतर तिघे साथीदार पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेले.

त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींकडून दोन कोयते, मिरची पावडर, नायलॉनची दोरी असा 65 हजार 940 मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी आपल्या पथकासह हडपसर परिसरात गस्तीवर होते. त्या वेळी त्यांना बातमीदारामार्फत दरोड्याच्या तयारीतील टोळीची माहिती मिळाली होती. पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. तर तिघा आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत पेट्रोल पंपावरील रोकड लुटण्याची योजना त्यांनी आखल्याची कबुली दिली.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे कर्मचारी रमेश साबळे,राजस शेख, आश्रुबा मोराळे, प्रताप गायकवाड, शहाजी काळे, विलास खंदारे, राहुल ढमढेरे यांच्या पथकाने केली.

जबरी चोरीच्या 18 गुन्ह्यांचा छडा

अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून कोयत्याच्या धाकाने केलेल्या तब्बल 18 जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला आहे. कोंढवा, वानवडी, हडपसर,बिबवेवाडी, स्वारगेट आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी हे गुन्हे केले आहेत. रात्रीच्यावेळी कोयत्याच्या धाकाने नागरिकांना आरोपी लुटत होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT