Pune Shivajinagar Court Firing video Pudhari
पुणे

Pune Shivajinagar Court Firing: आधी बंदूक काढली, मग कोयत्याने सपासप वार केले; पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा हल्ला, व्हिडिओ समोर

Pune Shivajinagar Court Firing: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ समोर बुधवारी सहा जणांनी एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केला.

Rahul Shelke

Pune Shivajinagar Court Firing: पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर बुधवारी (२५ नोव्हेंबर) भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी असतानाच हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सहा हल्लेखोर दोन दुचाकींवरून घटनास्थळी आले होते. त्यांच्याकडे बंदुका आणि कोयते होते. सुरुवातीला एका हल्लेखोराने पिस्तूल बाहेर काढले, तर इतरांनी कोयत्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. यानंतर गोळीबारही करण्यात आला. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी संबंधित व्यक्ती न्यायालयाच्या आवारात पळत होती. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. तो घाबरून खाली बसल्यानंतर काही जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. भीतीमुळे उपस्थित नागरिकांपैकी कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही, अशी माहितीही एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी सुझुकी अॅक्सेस आणि अॅक्टिव्हा या दोन दुचाकींचा वापर केला. एका दुचाकीवर चौघे, तर दुसऱ्या दुचाकीवर दोघे जण बसून पसार झाले. हल्ल्यानंतर जखमी व्यक्ती काही वेळाने उठून बाजूला आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला रिक्षातून तातडीने रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, घटनास्थळी एक पिस्तूल आणि काडतुसांनी भरलेली मॅगझीन आढळून आली आहे. न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या काही वकिलांनीही या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी अचानक शस्त्रे बाहेर काढल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथकाकडूनही तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी व्यक्तीची ओळख आणि हल्लेखोरांची माहिती मिळवण्याचे काम पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे, न्यायालयासारख्या गर्दीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणाबाहेरच अशा प्रकारे गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT