पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा कैदी पळून जाण्याच्या घटनेमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी (दि. 19) दुपारी, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेला सनी गौतम कुचेकर हा आरोपी 'एमआयसीयू' (MICU) वार्डच्या बाथरूमची काच तोडून पसार झाला. या धक्कादायक घटनेमुळे ससूनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आरोपी सनी कुचेकर याच्यावर एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्यावर 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. २९ डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून त्याला अटक करण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणास्तव त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथून त्याने पळ काढला.
ससून रुग्णालयातून आरोपी पळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांतील घटनांवर नजर टाकल्यास प्रशासनाचा ढिसाळपणा स्पष्टपणे दिसून येतो.
मार्च २०२५ : विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी यशवंत साठे पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता.
फेब्रुवारी २०२४ : गुंड शरद मोहोळच्या पत्नीला शिवीगाळ करणारा मार्शल लुईस लीलाकर हा आरोपी पळाला होता (ज्याला नंतर पुन्हा अटक करण्यात आली).
ऑक्टोबर २०२३ : संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याच रुग्णालयातून पळाला होता.
पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एमआयसीयू वार्डसारख्या संवेदनशील ठिकाणी खिडकीची काच तोडली जात असताना सुरक्षा रक्षक आणि पोलीस काय करत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली असून सनी कुचेकरच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.