Pudhari
पुणे

Pune Crime : खेड तालुका हादरला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कडूस येथील तरुणाचे विकृत कृत्य

इन्स्टाग्रामवरून प्रेमाचे जाळे, अन् लॉजवर नेऊन अत्याचार; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर : अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैभव शिवाजी मुसळे, रा.कडूस ता.खेड असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी शिक्षणानिमित्त नारायणगाव येथे राहत असून, तिने मंगळवारी (दि १०) आपल्या मामाच्या मदतीने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, वैभव मुसळे याने सुरुवातीला तिच्याशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला. तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्यानंतर त्याने प्रपोज केले आणि प्रेमाचे जाळे विणले. मुलीने ‘मी अजून लहान आहे, शिक्षण पूर्ण करायचे आहे’, असे सांगून नकार दिला, तरीही त्याने इन्स्टाग्राम आणि फोनवरून सतत संपर्क ठेवला व त्रास दिला.

ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपीने मुलीला मंचर, ता. आंबेगाव येथे बोलावले. तेथे त्याने आपल्या चारचाकी गाडीने तिला स्काय ७ लॉजवर (जैदवाडी/सांडभोरवाडी, पुणे-नाशिक महामार्ग, ता. खेड) येथे नेले. तेथे त्याने ‘आपण सोबत राहू’ असे सांगून मुलीच्या नकाराकडे दुर्लक्ष करून जबरदस्तीने बलात्कार केला. मुलीने घाबरून कोणालाही सांगितले नाही. यानंतर १५ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा वैभवने तिला खेड येथे बोलावले आणि त्याच स्काय ७ लॉजमध्ये नेले. तेथे पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही त्याने इन्स्टाग्राम आणि फोनवरून तिला फॉलो करून त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मुलीने हा सर्व प्रकार आपल्या मामाला सांगितल्यानंतर मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली. वैभव मुसळे याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही असे कृत्य केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, IPC कलम ३७६ (बलात्कार), POSCO बाल लैंगिक अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून, आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT