पुणे : टीव्ही बंद करण्यास सांगितल्यानंतर झालेल्या वादातून मुलाने वृद्ध वडिलांवर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील जय भवानीनगर परिसरात घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. तानाजी पायगुडे (वय 72, रा. जय भवानीनगर, पौड रस्ता, कोथरूड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय 33) याला अटक करण्यात आली. याबाबत तानाजी यांची पत्नी सुमन (वय 68) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायगुडे कुटुंबीय जय भवानीनगर भागातील चाळीत राहायला आहेत. पायगुडे यांचे बैठे घर आहे. गुरुवारी (दि.2 ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास तानाजी पायगुडे आणि त्यांचा मुलगा आरोपी सचिन हे पोटमाळ्यावर होते. दसरा असल्याने पायगुडे कुटुंबीय घरात होते. तानाजी यांच्या डोळ्यात औषध टाकायचे होते. त्यांनी मुलगा सचिन याला टीव्ही बंद करण्यास सांगितले. या कारणावरून सचिन आणि वडील तानाजी यांच्यात वाद झाला. वादातून सचिनने घरातील चाकूने वडील तानाजी यांचा गळा आणि चेहर्यावर वार केले. पोटमाळ्यावरील आरडाओरडा ऐकून तानाजी यांची पत्नी सुमन या पोटमाळ्यावर गेल्या. तेव्हा तानाजी हे गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले.
आरोपी सचिन घरातून पसार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेतील तानाजी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक पवार तपास करत आहेत.