पुणे : खाऊ देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षांच्या चिमुरडीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चंद्रशेखर दीपक वनशिवे (वय ३२, रा. पारगाव, ता. दौंड) यास न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास त्याला १ वर्षे अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. याबरोबरच पीडितेला ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.
याबाबत पीडितेच्या आईने शिरूर पोलिसात फिर्याद दिली होती. शिरूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. मजुरी करणारी फिर्यादी, पती, पीडित आणि ५ वर्षाचा भाऊ असे त्यांचे कुटुंब होते. वनशिवे तेथे कामास जात होता. त्यामुळे त्याची ओळख होती. खाऊच्या बहाण्याने तो पीडितेला घेऊन गेला. अत्याचार करून दुसऱ्या दिवशी घरी एकटीला पाठवून दिले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे मिलिंद दातरंगे यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे यांनी तपास केला.