पुणे

Pune Crime : घाम गाळला शेतकऱ्याने, नफा लुटला चोराने! दीड लाखांचा कांदा चोरीला, निमगाव सावा येथून ६३ गोण्या लंपास

कांद्याला चांगला भाव मिळताच चोरटे सक्रिय; नारायणगाव पोलिसांत चोरीची तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे कांदा चोरीची धक्कादायक घटना घडली असून, चोरट्यांनी शेतकऱ्याच्या कांदा चाळीचे कुलूप तोडून तब्बल ६३ गोणी कांदा चोरून नेला आहे. या चोरीमध्ये प्रभाकर संभाजी भापकर या शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी (दि. १) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा संशय संबंधित शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. कांद्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी कांदा चाळींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

निमगाव सावा येथील संबंधित शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याची साठवणूक करण्यासाठी कांदा चाळीची व्यवस्था केली होती. बाजारात अपेक्षित दर मिळाल्यानंतर विक्री करता यावी, या उद्देशाने कांदा चाळीत साठवून कुलूप लावले होते. मात्र, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी संधी साधत कांदा चाळीचे कुलूप तोडले आणि आतील ६३ गोणी कांदा लंपास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी चाळीचे कुलूप तुटलेले आणि कांद्याच्या गोण्या गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. परिसरात शोध घेऊनही कांद्याचा काहीच मागमूस न लागल्याने त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

कष्टाने पिकविलेला कांदा चोरीला

शेतीमध्ये बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी आणि मशागतीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यानंतर नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. उत्पादनानंतर बाजारभाव समाधानकारक नसल्यास अनेक शेतकरी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवतात. बाजारभावात सुधारणा झाल्यानंतर कांद्याची विक्री करून चार पैसे मिळतील, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, अशा प्रकारे साठवून ठेवलेला कांदाच चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, निमगाव सावा परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

कांदा चाळींवर सीसीटीव्हीचा पहारा

सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने साठवणुकीकडे शेतकरी विशेष लक्ष देत आहेत. मात्र, कांदा चाळी गावापासून किंवा घरापासून काही अंतरावर शेतात असल्याने रात्रीच्या वेळी तेथे सतत लक्ष ठेवणे शक्य होत नाही. याचाच गैरफायदा चोरटे घेत आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कांदा चाळींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, जेणेकरून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवता येईल आणि चोरी झाल्यास आरोपींची ओळख पटवणे शक्य होईल.

नारायणगाव पोलिसांत तक्रार; रात्रीच्या गस्तीची मागणी

या चोरीप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करून चोरीला गेलेला कांदा हस्तगत करावा आणि चोरट्यांना तातडीने बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. तसेच परिसरातील कांदा चाळींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT