पुणे

Pune Crime : जेजुरी गडावर मद्यपींचा राडा; दगडफेक करत स्थानिकांना मारहाण, ८ स्थानिकांसह १२ जण जखमी

ग्रामस्थांत प्रचंड संताप

पुढारी वृत्तसेवा

जेजुरी : सोमवती यात्रेनिमित्त कल्याण तालुक्यातून जेजुरीत देवदर्शनाला आलेल्या मद्यपी भाविकांनी धूडगूस घातला. आपसातील वादातून त्यांच्यात मारहाण सुरू झाली होती. ही भांडणे सोडवण्यास गेलेल्या स्थानिकांनाही त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे भाविकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मारहाणीत हनुमंत शंकर गोडसे, प्रवीण हनुमंत गोडसे, राहुल पांडुरंग गोडसे, धनंजय प्रकाश गोडसे, हरिभाऊ शंकर गोडसे, शीतल धनंजय गोडसे, संजय ज्ञानेश्वर तांबे (सर्वजण रा. चिंचेची बाग, जेजुरी) या स्थानिकांसह निलेश कांताराम भिसे, सुरज द्वारकानाथ भोईर (दोघे रा. रायता, ता. कल्याण जि. ठाणे), भूषण किसन रोने, किसन वामन रोने (दोघे पिंपळोली, ता.कल्याण जि. ठाणे) हे भाविक जखमी झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातून ३० ते ३५ भाविक सोमवती यात्रेसाठी रविवारी (दि. १४) जेजुरीत आले होते. ते जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गोडसे हॉल येथे उतरले होते. त्यातील काही जणांनी दुपारी नशापान केले. यातून त्यांच्यात भांडण सुरू झाले. हा वाद वाढू लागल्याने हॉल मालक राहुल गोडसे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र मद्यपींनी त्यांनाच दगड आणि दांडक्यांनी मारहाण केली. मारहाण करून पळून जाणाऱ्या मद्यपींना स्थानिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही त्यांनी दगडफेक केली. यात स्थानिकही जखमी झाले आहेत.

दरम्यान, घटनेबाबत जेजुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र घटनास्थळी पोलिस पोहचेपर्यंत काही भाविक पळून गेले आहेत. मारहानीत जखमी झालेल्यांना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स, रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. या प्रकरणी काही भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

स्थानिकांसह भाविकांत संताप

गेल्या महिनाभरात जेजुरीत भाविकांकडून स्थानिकांना मारहाण करण्याचे दोन-तीन प्रकार घडले आहेत. देव दर्शनासाठी येथे येणारे भाविक दारू पिऊन डीजे व वाद्याच्या तालावर धिंगाणा घालतात. यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. ग्रामस्थांनी या दोन्ही वर रात्री दहानंतर जेजुरी पोलिसांकडून बंदी आणावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अन्यथा गाव बंद ठेवून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT